परभणीसह मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम तत्काळ द्यावी, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, या मागणीसाठी आमदार विजय भांबळे यांनी विधानभवनासमोर निदर्शने केली.
५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारीमुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीकविमा भरला आहे. कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल ८ कोटी ६० लाख रुपयांचा पीकविमा भरला. जिल्हय़ातील शेतकरी दरवर्षी पीकविमा भरतात. परंतु आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला पीकविम्याची भरपाई मिळाली नाही. या वर्षी पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी लागणारे निकष पूर्ण झाले आहेत. गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ अशा सततच्या नसíगक संकटात नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र, पीकविमा भरूनही रक्कम मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी भरलेल्या पीकविम्याची रक्कम तत्काळ वाटप करावी व शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी करीत आमदार भांबळे यांनी विधानभवनासमोर निदर्शने केली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. राहुल पाटील, मोहन फड व संतोष टारफे उपस्थित होते.