जिल्ह्य़ातील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व १७ संचालकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शुक्रवारी कामगारांनी कारखान्याचे अध्यक्ष व्ही. यु. पाटील यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. तीन संचालकांनी राजीनाम्याच्या साक्षांकित प्रती दिल्या असल्याचा दावा संघटनेचे कार्याध्यक्ष मोहन पाटील यांनी केला आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम सुरू न केल्याने राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनने कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांच्या निमझरी नाक्यावरील कार्यालयासमोर दुपारी १२ वाजेपासून निदर्शनांना सुरूवात केली. तत्पूर्वी कामगार व शेतकऱ्यांनी मोर्चा काढून कार्यालयासमोर ठिय्या दिला. या वेळी पाटील कार्यालयात नव्हते. गेल्या तीन वर्षांपासून कारखाना बंद असल्यामुळे शेतकरी व कामगार यांचे नुकसान होत आहे. तीन वर्षांंपासून कामगारांना पगार मिळालेला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
संघटनेने आंदोलनास सुरूवात करताच मनोहर पाटील, संजय पटेल, किशोर राजपूत या तीन संचालकांनी आपल्या राजीनामा पत्राच्या साक्षांकित प्रती संघटनेकडे पाठविल्या. तीन वर्षांपासून कारखाना सुरू न झाल्याने राजीनामा देत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान, कारखान्याला जाणीवपूर्वक आर्थिक अडचणीत आणणाऱ्या जिल्हा बँकेवर मोर्चा काढून जाब विचारण्यासाठी कामगार पुढे का येत नाहीत, असा सवाल शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व्ही. यु. पाटील यांनी केला आहे. कारखान्याचे खाते कृत्रिमरित्या थकीत करण्यात आल्यानंतर सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टखाली कारखाना ताब्यात घेण्याची कार्यवाही जिल्हा बँकेकडून करण्यात आली.
कारखाना खासगी कारखानदाराला विकण्याचा प्रयत्नदेखील केला गेला. कारखाना विक्रीचा डाव लक्षात येताच संचालक मंडळाने औरंगाबाद येथे कर्जवसुली न्यायाधिकरणात धाव घेतली आणि विक्री प्रक्रियेला स्थगिती मिळवली, असे पाटील यांनी नमूद केले.