22 October 2020

News Flash

सोलापुरात डेंग्यूसदृश आजाराचा विळखा

सोलापूर शहर व जिल्ह्य़ात गेल्या महिनाभरात डेंग्यूच्या आजाराचा वाढलेला विळखा घट्ट होऊ लागला आहे.

 

|| एजाजहुसेन मुजावर

सोलापूर शहर व जिल्ह्य़ात गेल्या महिनाभरात डेंग्यूच्या आजाराचा वाढलेला विळखा घट्ट होऊ लागला आहे. शहरातील विविध लहान-मोठय़ा रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश आजाराने पछाडलेले सुमारे एक हजार रुग्ण वैद्यकीय उपचार घेत असल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय क्षेत्रात वर्तविला जात आहे. मात्र महापालिका प्रशासनाने शहरात डेंग्यूसदृश दोनशेपर्यंतच असल्याचा दावा केला आहे.

शहरात वाढत्या डेंग्यूसदृश आजाराच्या प्रादुर्भावामुळे बहुसंख्य लहान-मोठी रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. १५ खाटांच्या एखाद्या लहानशा रुग्णालयातदेखील किमान पाच रुग्ण हे डेंग्यूसदृश आजाराने दाखल झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. लहान मुलांना तर या आजाराने मोठय़ा प्रमाणात पछाडले आहे. बालरुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश बालरुग्णांचीच गर्दी जास्त झाल्याचे दिसून येते. प्रत्येक रुग्णालयात दाखल झालेल्या डेंग्यूसदृश रुग्णाची माहिती संबंधित रुग्णालयाकडून महापालिका आरोग्य विभागाला पाठविली जाते. त्यानुसार पालिकेच्या यंत्रणेकडून संबंधित रुग्णाची माहिती घेऊन पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत संबंधित रुग्णाच्या रक्तांच्या नमुन्यासह पाठविली जाते. तेथून अंतिम अहवाल आल्यानतरच संबंधित रुग्णाला डेंग्यूचा आजार खरोखर झाला किंवा कसे, याची अधिकृत माहिती निष्पन्न होते. परंतु ही प्रक्रिया सहज सुलभ नसते. त्यात बराचवेळा विलंब होतो. शहरात एखादा रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती मिळाल्यानंतरदेखील महापालिकेची संबंधित यंत्रणा त्यानुसार सक्रिय होईलच, याची शाश्वती नसते, असाही आक्षेप वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींकडून घेतला जातो.

दरम्यान, वाढत्या डेंग्यूसदृश आजारामुळे पालिका सभागृहनेते श्रीनिवास करली व वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालिका आरोग्य यंत्रणेला जागे होण्यासाठी लेखी सूचना केल्या आहेत. काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांनीही शहरात या आजाराचे रुग्ण वाढले असताना त्यावर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजना तत्काळ हाती घेण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

पाणी साठवणे धोक्याचे

शहरात तीन ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणी साठवून ठेवणे हे डेंग्यूच्या डासांच्या निर्मितीला पोषक ठरते आहे. विशेषत: झोपडपट्ट्ी व चाळींसारख्या भागात लहान घरांमध्ये पाणी साठविण्यासाठी पुरेशा सोयी नसल्यामुळे पाच दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेवताना डासांच्या प्रादुर्भावाला वाव मिळतो. शहर व परिसरात हेच सार्वत्रिक चित्र दिसून येते. पावसामुळे काही ठिकाणी साठलेले पाणी देखील या डासांच्या निर्मितीला पोषक ठरते आहे.

दहा ते पंधरा हजारांचा भरुदड!

वाढत्या डेंग्यूसदृश आजारामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेताना किमान दहा ते पंधरा हजारांचा भरुदड सोसावा लागत आहे. या आजाराने सामान्य रुग्णांबरोबर काही डॉक्टरांनाही पछाडले आहे. सात रस्ता भागातील एका बालरोगतज्ज्ञासह विजापूर रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर राहणाऱ्या एका डॉक्टरासह त्याच्या संपूर्ण कुटुंबीयाला डेंग्यूसदृश आजाराने पछाडले आहे. सद्य:स्थितीत किमान पंधरा डॉक्टर या आजाराने त्रस्त असल्याची माहितीही समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 2:26 am

Web Title: dengu hospital patient akp 94
Next Stories
1 वाढीववासीयांचा प्रवास सुखकर?
2 भातशेती नुकसानीचा कृषीपूरक व्यावसायांना फटका
3 ठाकरे कलादालनावरून शिवसेना पुन्हा आक्रमक
Just Now!
X