24 September 2020

News Flash

बीडला आठवडयात डेंग्यूचा तिसरा बळी!

आठवडय़ात डेंग्यूने तिघांचे बळी घेऊनही आरोग्य यंत्रणा हाताची घडी तोंडावर बोट याच भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

| November 1, 2014 01:54 am

साथरोगाचा उद्रेक झाला असताना आरोग्य यंत्रणा मात्र साथीचा प्रादुर्भाव थांबविण्यात अपयशी ठरत आहे. आरोग्य विभागातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने जनतेपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. मंजूर पदांपकी अधिकारी-कर्मचाऱ्यांची तब्बल १४२ पदे रिक्त आहेत. या पाश्र्वभूमीवर परळीपाठोपाठ आता इतरत्रही डेंग्यूने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. माजलगावमध्ये १४वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. आठवडय़ात डेंग्यूने तिघांचे बळी घेऊनही आरोग्य यंत्रणा हाताची घडी तोंडावर बोट याच भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्हय़ात डेंग्यूने झपाटयाने हात-पाय पसरले आहेत. शहरासह ग्रामीण भागातही साथीच्या आजारांचा फैलाव झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागात एकूण मंजूर पदांपकी अनेक पदे रिक्त आहेत. यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११० पदे मंजूर असताना केवळ ६८ वैद्यकीय अधिकारीच कार्यरत आहेत. आरोग्य सेवकांची १८७ पदे असताना १२२ कार्यरत आहेत. औषध निर्माण अधिकाऱ्यांची ७२ पदे मंजूर असताना फक्त ३७ अधिकारी कार्यरत आहेत. एकूण ३६९ मंजूर पदांपकी २२७ कार्यरत असून १४२ पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागास रिक्त पदांचा सर्वाधिक फटका बसू लागला आहे. प्राथमिक केंद्रांसह उपकेंद्रांतही वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
परळीत डेंग्यूने दोन मुलांचा बळी घेतल्यानंतर आता माजलगाव येथील अस्लम शेख आबेद (वय १४) या मुलाला काही दिवसांपासून ताप येत असल्याने प्राथमिक उपचारानंतर औरंगाबादला नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परळीत दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य प्रशासनाने तेथे विशेष कक्ष स्थापन केला. खबरदारी म्हणून लोकांमध्ये जनजागृती घडवून आणली. मात्र, आरोग्य यंत्रणा प्रत्येक ठिकाणी सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहे. बहुतांश ठिकाणी मनुष्यबळाची अडचण येत आहे.
मंजूर पदांपकी १४२ पदे रिक्त असल्यामुळे इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडू लागला आहे. याचा आरोग्य सेवेवर थेट परिणाम होऊ लागला आहे. जिल्हय़ातील अकराही तालुक्यांत साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बठक घेऊन सूचना केल्या. परंतु सूचनांची अंमलबजावणी करण्यास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाची चांगलीच अडचण झाली आहे. मात्र, याच वेळी ग्रामीण भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी, डेंग्यूचा वाढता फैलाव थांबविण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम हाती घेणे आवश्यक ठरले आहे.
जनजागृती महत्त्वाची
डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. गावागावात साथीचे आजार पसरू लागले आहेत. वातावरणातील बदल व अस्वच्छता यामुळे हे आजार वेगाने बळावत आहेत. साथीच्या आजारांना थांबविण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. कोरडा दिवस पाळण्याची मोहीम हाती घेणे अपेक्षित आहे, शिवाय बॅनर, पॅम्पलेट या माध्यमातून या आजाराविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.
जि.प.च्या सभेत विरोधी सदस्यांचा आरोप
डेंग्यूने फास आवळला, आरोग्य यंत्रणा ढिसाळच!
वार्ताहर, जालना
जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात डेंग्यूपीडित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी आरोग्य विभाग मात्र याबाबत पुरेशा गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप जि.प. विशेष सर्वसाधारण सभेत विरोधी सदस्यांनी केला. जि.प.चे अध्यक्ष तुकाराम जाधव अध्यक्षस्थानी होते.  
गांधारी, गंगाचिचोली, इंदलगाव आदी गावांत डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आहेत. एकटय़ा गांधारीतील ३०-४० रुग्ण उपचारासाठी औरंगाबादला दाखल आहेत. वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्ण ताटकळून बसतात. सखापुरी आरोग्य केंद्रात दुय्यम वैद्यकीय अधिकारी असतात. डॉक्टरांनी औरंगाबाद, जालना, बीड येथून येणे-जाणे करण्यापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणीच राहिले पाहिजे. जिल्हय़ातील एकाही गावात दर शनिवारी कोरडा दिवस पाळला जात नाही आणि फॉगिंग मशिनने फवारणी करण्यात येत नाही, आदी बाबींकडे राष्ट्रवादीचे सतीश टोपे यांनी लक्ष वेधले.
प्रत्येक तालुक्यातील १०० ते २०० रुग्ण डेंग्यूवर उपचार घेत आहेत. शासकीय रुग्णालयात या सर्वाची नोंद नसली, तरी अनेकांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले असून सध्याही अनेक जण उपचार घेत आहेत. आपल्या जि.प. सर्कलमध्ये डेंग्यूचे ७ रुग्ण आहेत, याकडे पंकज बोराडे यांनी लक्ष वेधले. अॅड. काळबांडे व काँग्रेसचे लक्ष्मण दळवी यांनीही साथरोग, तसेच डेंग्यूबद्दल चिंता व्यक्त करून आरोग्य विभागाने योग्य ती दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या.
जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी सदस्यांच्या सूचनांची दखल घेऊन या संदर्भात तातडीने संबंधित अधिकारी व यंत्रणेची बैठक घेण्यात येईल. साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून, यापुढे अधिक गांभीर्याने प्रयत्न करण्यात येतील, असे म्हटले. खोतकर यांनी अधिकाऱ्यांच्या याबाबत पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. जि.प.चे आरोग्य अधिकारी डॉ. भटकर म्हणाले, की आरोग्य विभागाच्या पथकांनी दोन महिन्यांत ४० गावांना भेटी दिल्या. ५७ धूरफवारणी यंत्रे उपलब्ध असून त्याद्वारे १२८ गावांत फवारणी करण्यात आली. गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत घेतलेल्या १६६ पैकी २१ नमुने डेंग्यूचे आढळले आहेत.
जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी सतीश टोपे यांनी या वेळी केली. पुढील पाच-सहा महिन्यांत पाणीटंचाई जाणवणार असल्याने उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्यासाठी तालुकानिहाय बैठका घेण्याची सूचनाही त्यांनी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
नवीन सभापतींची निवड
सभेत अनिरुद्ध खोतकर (बांधकाम व वित्त), शहाजी राक्षे (समाजकल्याण), मीनाक्षी कदम (महिला व बालकल्याण), ए. जे. बोराडे (शिक्षण व आरोग्य), लीलाबाई लोखंडे (कृषी व पशुसंवर्धन) या सभापतींच्या विभागाची घोषणा करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 1:54 am

Web Title: dengue 3rd death in a week
टॅग Dengue
Next Stories
1 तीन पंचवार्षिकनंतर प्रथमच नांदेडला ‘लाल दिवा’ नाही!
2 हिंगोली जिल्हय़ात नापिकीने दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
3 इचलकरंजी पालिकेला नरेंद्र मोदींची अॅलर्जी
Just Now!
X