मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यूने थमान घातले असताना जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मात्र केवळ थातूरमातूर उपाययोजना केली. साथरोगाचे जिल्ह्यात अडीचशेहून रुग्ण आढळले आहेत. जवळपास पाच जणांचा डेंग्यूने बळी घेतला. परंतु फक्त दोन रुग्ण डेंग्यूने दगावल्याची व नऊ जणांनाच डेंग्यूची बाधा झाल्याची त्रोटक माहिती जिल्हा आरोग्य सभापती सुधाकर गुंड यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत पाडोळी व वाघोली गावांना रविवारी व सोमवारी सकाळी भेट देऊन साथरोगाने बाधित झालेल्या रुग्णांची विचारपूस केली. तसेच गावातील स्वच्छतेची पाहणी केल्याचे गुंड यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी सांगितले, की जिल्ह्यातील सरमकुंडी, घाटनांदूर, कण्हेरवाडी, शेळका धानोरा, वाघोली व खामकरवाडी या सहा गावांमध्ये साथरोगाचा उद्रेक झाला आहे. दोनपेक्षा अधिक रुग्णांना साथरोग झाल्यास ते संपूर्ण गाव साथरोगाने बाधित झाले, असे गृहीत धरून त्या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. या ६ गावांमध्ये एकूण ३७ रुग्णांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. पकी नऊ जणांना डेंग्यू, सहा जणांना चिकुनगुन्या झाला.
जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभा घेऊन साथरोगाबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. सूक्ष्म कृती उपाययोजनेतून ग्रामीण भागात २४ फॉगिंग यंत्रांद्वारे फवारणी करून कीटकजन्य रोगावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच गावागावांत आरोग्य कर्मचारी पाठवून साथरोगाबाबतची माहिती गोळा केली जाणार आहे. गृहभेटीतून तापीच्या रुग्णांचे सर्वेक्षण, डासअळीनाशक औषध पाण्यात टाकण्याची कार्यवाही केली जाणार आहे. ज्या गावात डासांचे प्रमाण अधिक आढळेल, त्या गावात जंतुनाशकाची फवारणी करून साथरोगावर नियंत्रण आणले जाणार आहे. फॉिगग यंत्राला लागणाऱ्या इंधनाची व्यवस्था सरपंच, ग्रामसेवकांनी करून देण्याची सूचना प्रशासनाकडून केल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
‘..तर रुग्णांना प्लेटलेट्सची गरज नाही’
डेंग्यूसदृश रुग्णाला २० हजारांपर्यंत प्लेटलेट्स असतील, तर त्या रुग्णाला डॉक्टरांनी प्लेटलेट्स देऊन गरीब रुग्णांकडून आर्थिक लूट करू नये. तसेच डॉक्टरांनी रुग्णांना घाबरवून त्यांच्याकडून लूट करू नये. तशी तक्रार आल्यास संबंधित खासगी डॉक्टरवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी दिला.
नेत्यांच्या गावात रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना
तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे एकाच घरातील चौघांना डेंग्यूचा आजार झाला. पकी एका चिमुकल्याचा सोलापूर येथे उपचारादरम्यान बळी गेला, तर तिघांवर उपचार सुरू आहेत. याची माहिती आरोग्य विभागाला नाही. परंतु वाघोली, पाडोळीसह काही ठराविक जि.प. सदस्यांच्या गावात रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना होत असल्याने ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.