माजी मंत्री एकनाथ खडसेंचे पुनर्वसन कधी करणार, या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे पत्रकारांवर घसरले. आम्हाला आमचा पक्ष चालवू द्या, तुम्ही नका सांगू.. अशा शब्दात संताप व्यक्त करत त्यांनी मूळ प्रश्नांना बगल दिली. या वेळी त्यांच्या शेजारीच बसलेल्या खडसेंनी काही न बोलता केवळ स्मितहास्य केले.
लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, दानवे हे सध्या राज्यातील ४८ मतदारसंघांचा दौरा करत आहेत. त्याअंतर्गत ते शनिवारी रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. सकाळी रावेर मतदारसंघाचा दौरा भुसावळ येथे झाला. या वेळी कार्यकर्त्यांनी खडसेंच्या पुनर्वसनाबाबत आक्रमक भूमिका घेत दानवेंना जाब विचारला. हाच धागा पकडत जळगाव जिल्हा भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दानवेंना विचारले असता ते संतप्त झाले. खडसेंवरील कोणतेही आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. सर्व आरोप बेछूट आहेत, असा खुलासा त्यांनी केला. मग त्यांचे पुनर्वसन कधी करणार, असे विचारले असता, काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, त्यांचा निर्णय लागल्यानंतर बघू, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मात्र न्यायालय आरोपांबाबत निर्णय देईलच, परंतु पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे, असे विचारले असता आम्हाला आमचा पक्ष चालवू द्या, असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. शिवसेनेबाबत विचारले असता, मतांचे विभाजन टाळण्यासाठी सेनेसह समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे, पक्ष म्हणून सेनेची भूमिका वेगळी असल्याने तसेच त्यांचा पक्ष वाढण्यासाठी ते भाजपवर टीका करतात. मात्र सरकार म्हणून त्यांच्यासोबत आमचे मतभेद नाहीत, असा दावा त्यांनी केला. राममंदिराबाबत उद्धव ठाकरे अयोध्येला जात असल्याचे त्यांनी स्वागत केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 9:49 pm