सोलापूर जिल्ह्य़ात माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, विश्वनाथ चाकोते, जयवंत जगताप अशा दिग्गजांसह तब्बल १७२ उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे.
सोलापूर जिल्ह्य़ात विधानसभेच्या ११ जागांसाठी १९८ उमेदवार आपेल नशीब आमजावत होते. यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच पक्षांना संमिश्र कौल मिळाला असला तरी त्यांच्या पराभूत उमेदवारांची अनेक ठिकाणी अनामत रक्कमही जप्त झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ४ उमेदवार  निवडून आले तरी या पक्षाच्या अन्य ५ पराभूत उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात महेश गादेकर (सोलापूर शहर उत्तर),   बाळासाहेब शेळके (सोलापूर दक्षिण), विद्या लोळगे (सोलापूर शहर मध्य), चंद्रकांत बागल (पंढरपूर) व दिलीप सिध्दे (अक्कलकोट) यांचा समावेश आहे. रश्मी बागल (करमाळा)यांनी चिवट झुंज दिल्याने त्यांची अनामत रक्कम शाबूत राहिली. सांगोला येथे राष्ट्रवादीने स्वत न लढता शेकापचे गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला होता.
 कॉंग्रेसने सर्व ११ ठिकाणी उभे केलेल्या उमेदवारांपकी तिघेजण विजयी झाले. पराभूतांमध्ये द. सोलापूरचे विद्यमान आमदार दिलीप माने व माढ्यातील कल्याण काळे यांचा अपवाद वगळता इतर सात जणांना अनामत रकमा गमवाव्या लागल्या. यात विश्वनाथ चाकोते (सोलापूर शहर उत्तर) व जयवंत जगताप (करमाळा) या दोन्ही माजी आमदारांसह गौरव खरात (मोहोळ), जगदीश बाबर (सांगोला), मरतड साठे (माळशिरस), सुधीर गाढवे (बार्शी) यांचा समावेश आहे.
 भाजपचे ७  उमेदवार उभे होते. त्यापकी दोन जागा मिळाल्या. उर्वरित पाच जणांची रक्कम जप्त झाली. यात प्रा. मोहिनी पत्की (सोलापूर शहर मध्य ), राजेंद्र मिरगणे (बार्शी) यांचा समावेश आहे. तर एक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेच्या ८ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. यात माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे (सोलापूर शहर उत्तर ), गणेश वानकर (सोलापूर दक्षिण ) यांचा समावेश आहे.  राष्ट्रवादीचे बंडखोर प्रा. लक्ष्मण ढोबळे (मोहोळ), माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (सोलापूर शहर मध्य), अपक्ष माजी आमदार रवी पाटील (द. सोलापूर ) यांनाही अनामत रक्कम वाचविता आली नाही.
सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडून आलेल्या उमेदवारांपकी सर्वाधिक ५६.७३टक्के मते घेण्याचा मान सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी मिळविला आहे. तर सर्वात कमी २७.९८ टक्के मते घेऊन कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) यांनी निवडणूक जिंकल्याची नोंद झाली आहे. अन्य निवडून आलेल्या आमदारांच्या मतांची टक्केवारी अशी- गणपतराव देशमुख (सांगोला- शेकाप) – ४७.६३, दिलीप सोपल (बार्शी-राष्ट्रवादी) -४५.७४,  सिध्दाराम म्हेत्रे (अक्कलकोट-कांॅग्रेस) -४५.७१, भारत भालके (पंढरपूर-कॉंग्रेस)-४५.७१,  माढा-बबनराव शिंदे,राष्ट्रवादी-४३.८२, सोलापूर दक्षिण-सुभाष देशमुख,भाजप-४०.३७,  माळशिरस-हणमंत डोळस, राष्ट्रवादी-३७.८७, मोहोळ- रमेश कदम,राष्टवादी-४२.४२,  करमाळा-नारायण पाटील, शिवसेना-२९.९३ आणि सोलापूर शहर मध्य-प्रणिती शिंदे,कॉंग्रेस-२७.९८