राज्य सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनेत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील ४२ हजार शेतकरी खातेदार पात्र ठरले आहे. त्यांना २२४ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, पैकी ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १८५ कोटी जमा झाल्याची माहिती पालकमंत्री तथा राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्यातील सव्वाअकरा लाख खातेदारांवर कर्ज नाही, असे गृहीत धरून पुढील कर्जासाठी त्यांना पात्र ठरविण्यात आले असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी समितीची बैठक सातारा येथे पार पडली. बैठकीनंतर करोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा बँकेने व्याजदर कपातीच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयांची माहिती सातारा येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्हा बँक अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृषी कर्जमाफीच्या अनुषंगाने मंत्री बाळासाहेब पाटील आणि राजेंद्र सरकाळे यांनी संयुक्तपणे माहिती दिली. करोना संकटाच्या कालावधीत बँकेची वसुली ७१ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. बँकेचे योग्य नियोजन, उत्तम आर्थिक स्थिती आणि ग्राहकांचे हित डोळय़ासमोर ठेवून आर्थिक नियोजन केले आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेत राज्यातील सव्वाअकरा लाख शेतकरी पात्र ठरले असून, त्यांना ८ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. मात्र, करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या सर्वाना कर्ज नाही असे गृहीत धरून पुढील कर्जासाठी पात्र ठरवले गेले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने करोनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यतील गरजूंना १७ हजार ७०० किटवाटप केले आहेत. यामध्ये जीवनावश्यक साहित्य असल्यामुळे त्याचा फायदा गरजूंना झाला असून, यासाठी जिल्हा बँकेने एक कोटींचा खर्च केला आहे. दरम्यान, संचालक मंडळाने एक दिवसांचा भत्ता आणि बँक सेवकांचा एक दिवसाचा पगार असे १६ लाख आणि बँकेच्या नफ्यातील १ कोटी रक्कम असे १ कोटी १६ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा केले असल्याचे मंत्री पाटील व सरकाळे यांनी या वेळी सांगितले.