जलसंपदा खात्यातील राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारामुळेच नगर जिल्हय़ातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहिला आहे. त्यामुळेच या भागात समन्यायी पाणीवाटप होऊ शकले नाही. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर नगर जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर उपसा जलसिंचन योजना राबवण्यात येतील, असे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिले.
नगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारासाठी तावडे यांच्या सोमवारी मतदारसंघात चार सभा झाल्या. वांबोरी (राहुरी), निघोज (पारनेर), श्रीगोंदे आणि जामखेड येथे त्यांच्या सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिले. पक्षाचे उमेदवार खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार राम शिंदे आदींसह भाजप-शिवसेना युतीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.  
श्रीगोंदे व जामखेड येथे त्यांनी माळढोक अभयारण्याच्या मुद्दय़ावर भर दिला. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माळढोक पक्षी अभयारण्याचे भूत श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसवले. त्यांना कमी किमतीला शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घ्यावयाच्या आहेत. माळढोक आरक्षण हे राष्ट्रवादीचेच पाप आहे. आरक्षण उठवण्याचे ते फक्त नाटक करतात असा आरोप त्यांनी केला.
पारनेर येथे तावडे म्हणाले, नगर जिल्हय़ातील शेतकरी कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी वर्षांनुवर्षे भांडतो आहे. या संघर्षांत काही पिढय़ा संपल्या, मात्र राज्यातील आघाडी सरकारने या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. नगरकरांचे हक्काचे पाणी बारामतीला पळवून नेणाऱ्या अजित पवारांना आपण आव्हान देतो, की देशात मोदी सरकार आल्यावर सहा महिन्यांत नगरला कुकडीचे हक्काचे पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा संकल्प तावडे यांनी केला. आमदार विजय औटींनी पारनेर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी १० कोटींच्या पॅकेजची मागणी केली होती, तीही पूर्ण करू असे आश्वासन तावडे यांनी दिले.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा तावडे यांनी केवळ एक पुतळा असा या सभांमध्ये उल्लेख केला. ते म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकाळात देशात मोठा भ्रष्टाचार तर झालाच, मात्र देशाची प्रगतीही खुंटली. याला सोनिया, राहुल यांच्याबरोबरच मनमोहन सिंग हेही जबाबदार असून, देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.