संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. यामध्ये कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही. आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. सोमवारी राज्य सरकारनं राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच मध्यरात्री ही संचारबंदी लागूही झाली होती. त्यानंतरही मंगळवारी सकाळी नागरिकांनी रस्त्यांवर तसंच भाजी मंडईमध्ये गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. त्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका. कृपया सर्वांनी आपल्या घरीच रहा, अशी विनंतीही अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.


जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत

भाजीपाला, फळे, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. करोनाच्या धोक्यापासून दूर राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची स्वत:ची असून त्याप्रमाणे त्यांनी वर्तन ठेवावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

आणखी वाचा- करोनाचा साताऱ्यात प्रवेश; दुबईहून परतलेल्या महिलेला संसर्ग

शासनाला सहकार्य करावं
ज्यात संचारबंदी लागू असतानाही काही नागरिकांकडून बाजारात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. नागरिक अकारण गाड्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. करोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्यशासनाचा आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महापालिका, नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी सर्वजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. राज्याच्या प्रत्येक घरातला माणूस करोनाच्या संसर्गापासून मुक्त रहावा यासाठी ते धोका पत्करत असताना, जनतेनेही संयम पाळून शासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

आणखी वाचा- Coronavirus : कमीत कमी मनुष्यबळात आर्थिक बाजार चालवा – मुख्यमंत्री

करोनाचा प्रसार मर्यादित
करोनाच्या संसर्गापासून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. करोनाचे गांभीर्य ओळखून सर्वांनी घरी बसावे, व सहकार्य करावे. सुदैवानं, राज्यातला करोनाचा प्रसार अद्याप मर्यादित आहे. काही बाधित व्यक्ती करोनामुक्तही झाल्या आहेत, ही चांगली लक्षणं असल्याचे सांगून, करोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येकानं घरी बसून योगदान द्यावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.