सध्या राज्यात पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, महाविकासआघाडी सरकासह विशेष करून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपाकडून आरोप करण्यात आले आहेत. तसेच, मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा व या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले, ”संजय राठोड हे सर्व प्रकरणावर गुरुवारी खुलासा करणार असल्याची मला माहिती मिळाली आहे. माझा देखील त्यांच्याशी काही संपर्क झालेला नाही. परंतु त्यांच्यावर जे काही आरोप झालेत, त्याबद्दल आम्ही स्वतः व मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे की, कुणाच्याही बद्दल काही आरोप झाले तर त्याची रीतसर चौकशी झाली पाहिजे. त्या प्रकरणाची चौकशी पुणे पोलीस करत आहेत. काही लोकांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे. परंतु जो पर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत, निष्पाप व्यक्ती बद्दल नाव घेऊन कारण नसताना, त्यांना संशयच्या भोवऱ्यात टाकणं हे देखील फार उचित नाही. धनंजय मुंडेंच्याबाबतही या अगोदर तसंच झाल्याचं आपण सर्वांनी पाहीलं.”

‘मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा राजीनामा घ्यावा’

”वास्तविक राजकीय क्षेत्रात अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारी ती व्यक्ती आहे. ज्या मुलीबद्दल ही घटना घडली आहे. जिने आत्महत्या केली असं सांगितलं जात आहे, अर्थातच चौकशीत ते सर्व समोर येईल. पण तिच्या वडिलांचे वक्तव्य मी स्वतः टीव्हीवर पाहिलं. ते म्हणत आहेत की आमच्यावर कर्ज झालेलं होतं, ती आमच्या घरातील एक मुलगा असल्याप्रमाणेच वागत होती, तिने काही व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्देवाने करोनाचं संकट आलं, त्यामुळे तो व्यवसाय अडचणीत आला.” असं अजित पवार यांनी सांगितलं.

तसेच, ”आज या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे आणखी एक-दोन जणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. चौकशी नंतर सगळं स्पष्ट होईल. याच्यात कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही ती कुणीही व्यक्ती असो. पण चौकशी होऊन, संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी ठरवायचं किंवा एखाद्याला त्या पदावरून हटवायचं हे पण कितपत योग्य आहे? हा विचार करण्यासारखा भाग आहे. अर्थात ते शिवसेनेचे एख नेते आहेत आणि त्याबद्दल काय करायचं हे शिवसेनाच भूमिका घेऊ शकते. पण माझं स्वतःचं मत आहे की, जोपर्यंत चौकशीचा अंतिम अहवला येत नाही. तोपर्यंत थोडा संयम ठेवणं महत्वाचं आहे.” असंही यावेळी अजित पवार यांनी बोलून दाखवलं.