तीन पक्षांचं सरकार आल्यामुळे अजूनही विरोधकांच्या पोटात दुखत आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. हे सरकार पाडण्यासाठी विरोधक अनेक प्रयत्न करत आहेत मात्र पक्षांच्या अध्यक्षांचा पाठिंबा असेपर्यंत या आघाडीला काहीही धोका नाही असंही ते म्हणाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, विरोधकांनी दीड वर्षे सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना वाटत होतं मराठ्यांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी मोठे मोठे मोर्चे काढावेत, ओबीसींनी आरक्षण रद्द झालं म्हणून मोर्चे काढावेत. त्यांनी कायमच दुटप्पी भूमिका घेतली आहे. अर्थात विरोधकांचं कामच ते असतं. पण तरीही जोपर्यंत सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा पाठिंबा आहे तोवर महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही.

आणखी वाचा- लोकप्रतिनिधींना गाडण्याच्या उदयनराजेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा वर्तवली असल्यासंदर्भात अजित पवार यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, आता तर सध्या उध्दव साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार, काम करण्याचा फॉर्मयूला ठरला आहे. तसेच नानानी इच्छा व्यक्त केली असेल, हा नाना यांना पूर्ण अधिकार आहे. शेवटी लोकशाहीमध्ये कोणीही जरी इच्छा व्यक्ती केली. तरी 145 मॅजिक फिगर ती मिळवावीच लागते. जे तो आकडा गाठू शकतील, जर उद्या तुम्ही (ज्या पत्रकारांने प्रश्न विचारला त्याकडे पाहत) गाठू शकला. तर तुम्ही देखील राज्याचे प्रमुख होऊ शकता.

आणखी वाचा- सर्वांचा मान राखून आणि करोना प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करुन आंदोलन करुया, संभाजीराजेंचं आवाहन

उद्या कोल्हापुरात होणाऱ्या मूक आंदोलनाबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, संभाजीराजे यांनी आंदोलन करण्याऐवजी त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. पण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांना आहे. त्यांनी आंदोलन करावं पण करोना वाढणार नाही याची काळजी घेऊन करावं. त्याचबरोबर उद्या होणाऱ्या आंदोलनात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसंच हसन मुश्रीफ हेही सहभागी होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे त्यावर ५ जुलै रोजी होणाऱ्या राज्याच्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.