केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुली तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला. आपात्कालिन सेवांना काम करण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले होते. त्यांच्या या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी तात्पुरत्या टोल बंदीच्या घेतलेल्या निर्णयाचं अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं १४ एप्रिल पर्यंत म्हणजेच २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केला आहे. दरम्यान. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोल नाक्यांवर तात्पुरता टोल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आपात्कालिन सेवांना काम करण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर तात्पुरत्या स्वरूपात टोल बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गडकरी यांनी दिली. यामुळे आपात्कालिन सेवा देणाऱ्यांच्या वेळेचीही बचत होईल, असं ते म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली.

आणखी वाचा- Coronavirus : देशातील टोलनाक्यांवर तात्पुरती टोल वसुली बंद; गडकरींची घोषणा

आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांच्या दुरूस्तीचं काम आणि टोल नाक्यांवरील आपात्कालिन सेवा सुरू राहणार असल्याचं गडकरी म्हणाले. सध्या देशभरात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर महामार्ग आणि त्यांच्या राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. केवळ आपात्कालिन वाहनांनाच ये-जा करण्याची परवानगी असते. याव्यतिरिक्त केवळ जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारे ट्रक, सरकारी वाहनं आणि रुग्णवाहीकांनाच जाण्याची परवानगी आहे. योग्य ते कारण दिल्यासच खासगी वाहनांना पोलिसांकडून जाण्यायेण्याची परवानगी देण्यात येते.