राष्ट्रवादीचे कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार सुरेश लाड यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यात ते दोन अधिकाऱ्यांना मारहाण करत असल्याचे दिसते आहे. दरम्यान, हा व्हिडीओ आपला नसल्याचे लाड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

कर्जत तालुक्यात सध्या रिलायन्स कंपनीकडून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. विशेष म्हणजे गॅसची पाइपलाइन टाकण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या जात आहेत. या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व आमदार लाड करत आहेत. या पाश्र्वभूमीवर कर्जत तहसील कार्यालयात एका बठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना सुनावणीसाठी बोलावून यावेळी रिलायन्स गॅसपाइप लाइनसाठी शासनाने नेमलेले उपजिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी  शेतकऱ्यांच्या सातबारावर कंपनीचे नाव चढवत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आमदार लाड यांचा संयम सुटला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली. यावेळी काही व्यक्तींनी या घटनेचे चित्रीकरण केले आणि नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात आला.

या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांना मारहाण झाली आहे. त्यांनी याबाबत कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही, तर आमदार लाड यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता कोणालाही मारहाण केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान लाड यांनी आज कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन रिलायन्स पाइप लाइनविरोधात यापुढेही लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.