नागपूर प्रादेशिक उपवनसंरक्षक दीपक भट यांच्याजवळ सापडलेल्या १९ लाख रुपयांचे स्पष्टीकरण देऊ न शकल्याने ती बेहिशेबी मालमत्ता गृहित धरून त्याच्या पुणे व नागपुरातील घरी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने झडती सुरू केली आहे.
दीपक भट हे शुक्रवारी रात्री पुण्याला जात असतानाच त्यांना ताब्यात घेऊन भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्याजवळील बॅगमधील १९ लाख २५ हजार रुपये जप्त केले. रक्कम सील करून हा पैसा कुठून आणला, यामागील कारण स्पष्ट करण्यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत देण्यात आली. रविवारी त्यांना कार्यालयात पुन्हा पाचारण करण्यात आले. तेव्हाही ही रक्कम कशाची आहे, याचे समाधानकारक स्पष्टीकरण देऊ न शकल्याने त्यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.