‘मेफ्रेडोन’प्रकरण : बेबी पाटणकरकडून पाच लाख घेतल्याचा आरोप
‘मेफ्रेडोन ड्रग’ तस्करीतील संशयित बेबी पाटणकर हिच्याकडून पाच लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याबद्दल वाईचे पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे यांना तसेच मनसेचा एक कार्यकर्ता युवराज ढमाळ याला मुंबई आणि सातारा लाचलुचपत विभागाने आज ताब्यात घेतले.
मुंबई पोलिसात शिपाई असणारा धर्मराज काळोखे याच्या कणेरी (ता. खंडाळा) येथील घरातून ‘मेफ्रेडोन ड्रग’चा मोठा साठा मुंबई व सातारा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जप्त केला होता. याच वेळी त्याच्या मुंबईतील कार्यालयातील कपाटातूनही हाच साठा ताब्यात घेतला होता.
पुढे या प्रकरणी पोलिसांना राज्यातून व राज्याबाहेरूनही मोठा साठा जप्त केला होता. या प्रकरणात मुख्य तस्कर म्हणून बेबी पाटणकरचे नाव निष्पन्न झाले होते. या प्रकरणी अनेक पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली होती. या प्रकरणाचा तपास वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे यांच्याकडे होता.
या प्रकरणी सहकार्य मिळावे म्हणून ही लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता युवराज ढमाळ याचे सहकार्य घेण्यात आले होते.
त्याच्याकरवी पोलीस उपअधीक्षक हुंबरे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना पाच लाख रुपये देण्याचे ठरले होते. बेबी पाटणकर हिच्याकडून खंडाळा येथे आज ही रक्कम स्वीकारताना मुंबई व सातारा लाचलुचपत विभागाने ढमाळ याला ताब्यात घेतले. यानंतर या प्रकरणी हुंबरे यांनाही ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.