नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर जिल्हय़ात दोन ठिकाणी सापळे रचत एका नायब तहसीलदार (नगर) व एका हवालदाराला (पाथर्डी) लाच स्वीकारताना पकडले. एकाच आठवडय़ात चार सापळय़ात पाच सरकारी कर्मचारी अडकले आहेत. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नगरचे कार्यालय सावेडीतील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आहे, याच इमारतीत तहसील कार्यालय आहे. पथकाने तहसील कार्यालयातच दोन सापळे रचून महसूल खात्याच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडले आहे.
शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत विठ्ठलराव नागवडे (रा. आगरकर मळा, रेल्वे स्टेशन रस्ता, नगर) याला १० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. नागवडे याने काही दिवसांपूर्वी शेंडी येथील गुलाब पठाण यांची मुरूम वाहतूक करणारा ट्रक सावेडी नाक्याजवळ पकडली. पठाण यांनी कायदेशीर दंड भरून ट्रक सोडण्याची मागणी केली. मात्र नागवडे याने त्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली, ती स्वीकारताना तहसील कार्यालयातच त्याला पकडण्यात आले. रात्री उशिरा नागवडे विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर लगेचच दुपारी चारच्या सुमारास पाथर्डी पोलीस ठाण्यातील हवालदार अण्णासाहेब कुंडलिक सोनवणे याला ठाण्याच्या आवारातच दीड हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. मढी येथील दत्तात्रेय कटके व त्याचा भाऊ बाळू (सध्या रा. नगर) या दोघांविरुद्ध त्यांच्याच चुलत भावाने कोंबडय़ांना विष घालून मारल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हय़ात अटक टाळण्यासाठी सोनवणे याने कटके यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली, त्यातील दीड हजार रुपये, ठाण्याच्या आवारातील चहाच्या टपरीवर स्वीकारताना सोनवणेला पकडण्यात आले. पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.