बारकोड नसलेल्या आणि ऑनलाईन नोंदणी न झालेल्या शिक्षापत्रिका धारकांना धान्य मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. वंचित कुटुंबाना तहसीलदार कार्यालयांचे उबंरठे झिजवण्याची वेळ सध्या आली आहे. दरम्यान तांत्रिक अडचणी सोडवून सर्वांना धान्यवितरण केले जाईल अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

शासनाने अंतोदय आणि केशरी रेशनकार्ड धारकांना कार्डावर बारकोड देण्याची सुविधा केली आहे. ऑनलाइन नोंदणीही करण्याची सुविधा सुरु केली आहे. पण अर्ज भरूनही अनेक शिधापत्रिका धारकांना बारकोड उपलब्ध झालेला नाही. त्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रियाही पूर्ण होऊ शकलेली नाही. अशा शिधापत्रिका धारकांना सध्या धान्यपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे. दुकानदार धान्य देत नसल्याने तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची वेळ या सर्वांवर आली आहे.

टाळेबंदीमुळे अनेक असंघटीत कामगारांची मोठी कोंडी झाली आहे. काम बंद असल्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले आहेत. तर दुसरीकडे तांत्रिक कारणामुळे अन्नधान्याचा पुरवठाही बंद झाला आहे. अशा दुहेरी संकटात ही कुटुंब सापडली आहेत.

रायगड जिल्ह्यात १ हजार २९२ क्विंटल गहू, २ हजार २४६ क्विंटल तांदूळ  आणि २४४ क्विंटल साखरेचे आतापर्यंत वितरण करण्यात आले आहे. टाळेबंदीमुळे अडकून पडलेल्या २ हजार ५९८ शिधापत्रिका धारकांना आहे त्या ठिकाणी धान्यवाटप करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने आंतर्गत ५ किलो मोफत तांदुळाचे वाटप सुरु करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जादा दराने धान्य विक्री केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कोणीही रेशनकार्ड धारक धान्यपासून वंचित राहणार नाही –

अंतोदय, केशरी रेशनकार्ड धारकांच्या कार्डावर बारकोड असेल आणि ऑनलाइन नोंदणी केली नसेल तरी धान्य रेशन दुकानावर मिळेल. तसेच ज्याची नोंद वा बारकोड केली नसली तरी कोणीही रेशनकार्ड धारक धान्यपासून वंचित राहणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी सांगितले

शासनस्तरावरही पाठपुरावा सुरू –

ज्यांचे रेशनकार्ड आधार लिंक झाले नाही आणि ते रेशन धान्यपासून वंचित आहेत त्यांचे ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून अथवा ऑफलाईन पद्धतीने किंवा इतरांना जसे प्रशासन व सामाजिक संस्था धान्य पुरवठा करते, अशा पद्धतीने त्याची समस्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर शासनस्तरावरही याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी सांगितले.