वसईमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ तुंगारेश्वर येथे धबधब्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झालेला आहे. सुरक्षेकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी धबधब्याच्या जवळ जाण्यास बंदी घातली असतानाही धबधब्यात पर्यटकांची गर्दी कायम आहे. तसेच प्रशासनातर्फे लावण्यात येणारे मनाई फलक अद्यापही लावण्यात आलेले नाहीत.

पावसाळा सुरू झाल्यानंतर वसई येथील तुंगारेश्वर या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर गेल्या अनेक वर्षांपासून लाखोंच्या संख्येने पर्यटक सहलीसाठी येतात. परंतु हे स्थळ आता धोकादायक बनू लागले आहे. गेल्या वर्षी उत्साहाच्या भरात पाच तरुण धबधब्याजवळ गेले व अडकले होते. मोठी दुर्घटना होण्याआधीच त्यांना हेलीकॉप्टरच्या साह्य़ाने वाचवण्यात आले.

पुन्हा तशी दुर्घटना घडू नये यासाठी यावर्षी सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी धबधब्याच्या १०० मीटर जवळ जाण्यास बंदी घातली होती. परंतु बंदी असूनही पर्यटक मोठय़ा संख्येने धबधब्याजवळ जातात व नियमांचे उलंघन करत आहेत. तसेच तरुणांची सेल्फी काढण्यासाठी जीवघेणी हुल्लडबाजी देखील सुरू आहे.

पर्यटकांच्या या गैरवर्तनामुळे शनिवारी तीन तरुण तुंगारेश्वरच्या धबधब्यात पोहण्यासाठी उतरले होते. त्यातील एका तरुणाला धबधब्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. तर प्रशासनातर्फे तृंगारेश्वर येथे मनाई असलेल्या ठिकाणी मनाईचे सूचना फलक लावण्यात येणार होते. परंतु अद्यापही फलक लावण्यात आलेले नाहीत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना अद्यापही कागदावरच असल्याने पर्यटकांचा जीव अजूनही धोक्यात आहे.

तसेच जवळ जाणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी पोलीसदेखील तैनात करण्यात येणार होते, परंतु ते देखील कुठे पाहायला मिळत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचा नियम काढला, परंतु त्यासाठीचे प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. तरुणाचा बुडून मृत्यू झाला असला, तरीही प्रशासनाला अजूनही जाग आलेली नसून याबाबत प्रशासन सक्षम नसल्याचे दिसून येत आहे.

आम्ही पर्यटकांवर बंदी घातलेली नाही, तर १०० मीटरचे अंतर ठेवा असा  नियम काढलेला आहे. नद्या व धबधब्याच्या पाण्याला पावसाळ्यात जोर येतो, त्यामुळे तर अधिक धोकदायक असतात. त्यामुळे जवळ जाण्यास मनाई आहे. तसेच जर कोणीही जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थांबवण्याकरिता पोलीस तैनात केले आहेत.

– डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी