10 July 2020

News Flash

संशोधन होऊनही शेतकऱ्यांचे उत्पन्न कमीच

राज्यपाल कोश्यारी यांची खंत

(संग्रहित छायाचित्र)

देशातील शेती क्षेत्राच्या घटत्या आलेखाबाबत चिंता व्यक्त करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कृषी विद्यापीठांच्या संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसारातील मर्यादा स्पष्ट केल्या. संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोचल्याचा दावा विद्यापीठांकडून होऊनही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मात्र वाढ झालेली नाही, अशी खंत त्यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा अडतिसावा पदवीदान समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दादा भुसे, आमदार उदय सामंत, कुलगुरू संजय सावंत,  मत्स्य शाखेचे अधिष्ठाता प्रकाश शिनगारे, कृषी अधिष्ठाता सतीश नारखेडे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता यशवंत खांदेतोड, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, राहुरी कृषी विद्यापीठाचे के. पी. विश्वनाथा आणि कुलसचिव प्रमोद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल सुरूवातीला म्हणाले की, पदवीदान समारंभाचे सूत्रसंचालन स्थानिक मातृभाषा मराठीत होणे अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रम पत्रिकेचे स्वरूप देखील इंग्रजीबरोबरच िहदी आणि मराठीतही प्रकाशित करणे गरजेचे आहे. पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील आनंददायी प्रसंग असला तरी इतर कार्यक्रमांसारखा येथे गोंधळ करणे अनुचित आहे. उत्साहाच्या भरात असलेल्या विद्यार्थ्यांनी त्याचा विचार करावा, अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली.

आपण उत्तराखंडचे रहिवासी आहोत. तेथेही कोकणासारख्याच डोंगररांगा आहेत. त्यामुळे रत्नागिरीत आल्यानंतर मला आपल्या गावातच आल्यासारखे वाटले. पण गिरीदुर्गाचा रत्न असलेला हा रत्नागिरी प्रदेश लौकीकार्थानेही ज्वेल ऑफ माउंटेन्स आहे. या मातीत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी भविष्यात तोच मान सिद्ध करावा. शिवाजी आणि जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून. प्रत्यक्ष अंमलातही आणावा. देशासाठी शेती क्षेत्रातच उल्लेखनीय कामगिरी करावी, असे आवाहनही कोश्यारी यांनी यावेळी केले.

विद्यापीठाकडून संशोधनाचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे दिसते. त्यांच्याकडून हे संशोधन व तंत्रज्ञान बांधावर गेल्याचा दावाही केला जातो. सहा कोटी रूपये किमतीची विविध उत्पादने विकल्याची माहिती आपणास देण्यात आली. पण पुढील वर्षी हाच आकडा ६० कोटींवर जायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुळात अशा संशोधन कार्यानंतरही शेतकऱ्यांच्या जीवनमानात काहीच फरक पडलेला नसल्याचे जीडीपीच्या आकडय़ावरून लक्षात येते. देशाच्या जीडीपीमध्ये सध्या शेती क्षेत्राचा वाटा फक्त १४ टक्के आहे. महाराष्ट्राचा विचार करता १९६० मध्ये राज्याच्या जीडीपीमध्ये शेतीक्षेत्राचा हिस्सा २६ टक्के इतका होता. तो आता कमी होऊन १२ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही आकडेवारी देशासाठी आत्मपरिक्षण करण्यासारखी आहे.  देशातील जवळपास अध्रे मनुष्यबळ कृषिक्षेत्रात गुंतलेले असताना जीडीपीमध्ये या क्षेत्राचा घटता आलेख चिंतेची बाब आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेती आणि शेतीसंलग्न व्यवसायातील संधी शोधून ती स्वप्ने अंमलात आणणे गरजेचे आहे. शेतकरी हा देशाचा आत्मा आहे. औद्योगिक क्रांती कितीही झाली तरी अन्नासाठी शेतीशिवाय पर्याय नाही, असेही राज्यपालांनी सुचित केले. उत्तम शेती, मध्यम व्यवसाय, कनिष्ठ नोकरी आणि अतिकनिष्ठ भिक्षा हा  विचार सांगत कोश्यारी यांनी, मानवाचे खरे कल्चर अँग्रीकल्चर असून शेती संस्कृतीतून माणसाचा विकास झाला आहे, असे सांगितले.

पोर्तुगालमधून आपल्याला भेटायला आलेल्या अधिकाऱ्याने आपण योग करत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर आपल्याला रोज योगसाधना करण्यासाठी आता एका योग शिक्षकाची गरजही असल्याचे स्पष्ट केले. जगाला संस्कृतीसंपन्न भारताकडून खूप अपेक्षा आहेत, हेच यातून सिद्ध होते, असेही राज्यपालांनी सांगितले.

निसर्गरम्य देशात जसे काश्मीर तसे कोकण महाराष्ट्राचे नंदनवन आहे. येथे फक्त बर्फ नाही. पण आपण सर्वानी प्रयत्न केले तर ही भूमी शेतीबरोबरच पर्यटनातीलही मानदंड ठरू शकते, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. संजय सावंत यांनी सांगितले की, मार्च २०१९ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पथकाने पाहणी केल्यानंतर विद्यापीठाच्या अधिस्वीकृती मान्यतेचा निर्णय घेतला. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात मिळणाऱ्या संधी तसेच परिषदेकडून मिळणारा संशोधन व विकास निधी यामधील अडसर दूर झाला आहे. एवढेच नव्हे तर देशातील कृषी संशोधन क्षेत्रातील संस्थांमध्ये कोकण कृषी विद्यापीठाला बत्तीसावा क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे राज्यात राहुरीपाठोपाठ कोकण कृषी विद्यापीठ उत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे, अशी माहिती कुलगुरूंनी यावेळी दिली. कोकण कपिला गाय आणि कोकण कन्याळ शेळी या पशु संशोधनाने विद्यापीठाचे नाव देशात उज्वल झाल्याचेही त्यांनी सांगितले. भाताची कमी उंचीची जास्त कालावधीची जात, प्लास्टिक मिल्चगवरील थेट भातपेरणी तंत्रज्ञान, तसेच बांबूपासून बनवलेले कमी खर्चाचे पॉलिहाऊस, नवीन खेकडा संवर्धन तंत्रज्ञान, अझोला उत्पादन तंत्रज्ञान याबाबत विद्यापीठाकडून विशेष संशोधन केले जात असून त्याबाबत लवकरच शिफारस  प्रसारीत करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पदवीदानाऐवजी फोटोसेशन

कार्यव्यस्ततेमुळे राज्यपालांनी पदवीदान समारंभासाठी चार तारखा रद्द केल्यानंतर रविवारी अखेर वेळ निश्चित केली. त्यातही वेळ कमी असल्याने दीड तासात कार्यक्रम आटोपण्याचे निर्देश दिले. त्यामुळे फक्त १५ सुवर्णपदके विजेत्यांना प्रत्यक्ष पदवीदान करण्याचे त्यांनी मान्य केले. उर्वरित मुख्य स्नातकांना त्यांच्या पाठीमागे उभे राहून छायाचित्र काढण्याची मुभा दिली. त्यामुळे दोन वर्षांनी झालेल्या या कार्यक्रमात आपल्याला राज्यपालांकडून पदवी मिळेल, या पदवीधरांच्या आशेवर पाणी पडले. सकाळी १०.१०  वाजता हेलिकॉप्टरमधून खाली उतरलेले राज्यपाल तातडीने कार्यक्रम आटोपून दुपारी १२.२० ला हेलिकॉप्टरमध्ये बसून परतीच्या प्रवासाला लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 12:30 am

Web Title: despite the research farmers income is low governor koshari abn 97
Next Stories
1 आमदार रत्नाकर गुट्टेंसह बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा; फसवणुकीद्वारे २५ लाखांचे कर्ज उचलले
2 नातेवाईकाचं रक्षाविसर्जन करून परतताना काळाचा घाला; आठ ठार
3 देवेंद्र फडणवीस यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार
Just Now!
X