हर्षद कशाळकर

विकासाचे भकास स्वरूप..

रायगड जिल्ह्यत सध्या मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधांचे विकास प्रकल्प राबविले जात आहेत. मात्र या प्रकल्पांसाठी येथील पर्यावरणावर मोठे आघात होताना दिसत आहे. ही विकासकामे करताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. सध्या मात्र ते होताना दिसून येत नाही.

महामुंबईचा विस्तार आता रायगड जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाला आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. नवी मुंबई विमानतळाची उभारणी पनवेल परिसरात होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू झाले आहे. पनवेल आणि उरण परिसरातील रस्त्यांच्या चौपदरीकरणाची कामे जोमाने सुरू आहेत. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे कामही सुरू झाले आहे. शिवडी न्हावा-शेवा सििलकचे कामही सुरू झाले आहे. या सगळ्या विकासकामांचा जिल्ह्यातील पर्यावरणावर मात्र घातक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कर्नाळा अभयारण्यातील वनसंपदेसह मोठय़ा प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली. नवी मुंबई विमानतळासाठी खारफुटीची कत्तल करण्यात आली. पाण्याचा निचरा होणारे नसíगक स्रोतही या परिसरात होणाऱ्या भरावांमुळे बाधित झाली. भरावासाठी डोंगर पोखरून काढले जात आहेत.

पर्यावरणाची हानी होईल आणि कर्नाळा अभयारण्यातील पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येईल यासाठी महामार्ग रुंदीकरणाचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाने दोन वेळा फेटाळला होता. मात्र प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन नंतर पर्यावरण मंत्रालयाने या रुंदीकरणाला मंजुरी दिली होती. तोडल्या जाणाऱ्या झाडांचे पुनरेपण करणे, नवीन झाडांची लागवड करणे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र महामार्गावरील झाडांचे पुनरेपण झालेच नाही. तर अद्यापपर्यंत नवीन झाडे लावण्यासही सुरुवात झाली नाही. हा महामार्ग हरित महामार्ग असेल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र सध्यातरी त्या दृष्टीने शासनस्तरावर कुठलीच पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे.

मुंबई- गोवा महामार्गावर पनवेलहून पेणच्या दिशेने येताना याचाच प्रत्यय येत आहे. महामार्गाच्या भरावासाठी हमरापूरजवळ असलेल्या आर्यन हॉटेलशेजारील डोंगर सध्या मोठय़ा प्रमाणात पोखरले जात आहेत. दुसऱ्या बाजूला महाड येथे सव जवळ नदीकिनाऱ्यावर असलेली मोठी झाडे गरज नसताना तोडण्यात आली आहेत. त्यामुळे विकासकामे करताना पर्यावरणाचा समतोल ढासळणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. आधीच रासायनिक प्रकल्पांमुळे कोकणातील पर्यावरणावर घातक परिणाम झाले आहेत. त्यामुळे यापुढील काळात परिस्थिती अधिकच बिकट होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

विकासाला आमचा विरोध नाही. पण विकास करताना कमीत कमी पर्यावरणाची हानी होईल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोकणात १४० पर्यावरणासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था आहेत. त्यांची मदत घेणे गरजेचे होते. तसे झाले नाही. शासनाने रस्त्याच्या कामासोबत दोन्ही बाजूला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. जेणेकरून महामार्गाचे काम पूर्ण होईल तोवर हे वृक्ष लागवडीचे कामही पूर्ण होईल.

‘महामार्गाचे रुंदीकरण करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली शंभर ते दीडशे र्वष जुनी झाडे तोडली गेली. एकही झाड लावले गेले नाही. मुळात महामार्ग रुंदीकरण करताना कमीत कमी झाडे कशी तुटतील याचा विचार करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. परदेशात महामार्गाच्या दोन्ही बाजूला झाडांची लहान लहान बेटे तयार केली जातात. आपल्याकडे मात्र फुलापानांची झुडपे लावली जातात.’

–  प्रेमसागर मिस्त्री, सिस्केप संस्था.