करोना काळातील ‘कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाचे’ मॉडेल मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापकांनी विकसित केले आहे. या मॉडेलला भारतीय पेटंटच्या जर्नलमध्ये प्रसिद्धी देऊन मान्यता देण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उप-परिसर उस्मानाबाद येथील व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अरुण अमृतराव व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूर येथील व्यवस्थापन संकुलाचे डॉ. हनुमंत श्रीराम पाटील यांनी हे तयार केले आहे. हे मॉडेल कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या मॉडेलच्या पेटेंटसाठी मुंबई येथील भारतीय पेटेंट कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मॉडेल भारतीय पेटेंटच्या जर्नल मध्ये १७ जुलै रोजी प्रकाशितही झाले आहे.

जगात सध्या सुरू असलेली करोनाची महामारी व त्याचा देशाच्या एकूण आर्थिक परिस्थितीवर होणारा आर्थिक परिणाम याबाबत अभ्यासपूर्ण मांडणी यात करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांनी आर्थिक व्यवस्थापन केले होते त्यांना या संकटकाळात अचानक उदभवलेल्या परिस्थितीशी सामना करताना आर्थिक आडचणी तुलनेने कमी आल्या असल्याचे या संशोधनात मांडण्यात आले आहे. कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापन ज्यांनी केले नाही, अशा परिवाराला किंवा व्यक्तींना मात्र परिस्थितीशी सामना करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

सदर मॉडेल हे कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. या मॉडेल पेटेंटसाठी मुंबई येथील ‘सिस्टम अँड प्रोसेस फॉर फायनंसियल मॅनेजमेंट विथ कस्टमर सेल्फ सर्विस’ या नावाने हे नवे मॉडेल प्रकाशित करण्यात आले आहे. हे मॉडेल विकसित करताना विद्यापीठ उपकेंद्रातील व्यवस्थापन शास्त्र विभाग आणि उपकेंद्र लातूर यांची मोठी मदत झाली आहे. या उपलब्धीबद्दल दोन्ही प्राध्यापकांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, संचालक डॉ. डी. के.गायकवाड यांच्यासह सर्व सहकारी व अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.