News Flash

‘ती’ नरभक्षक वाघीण सांभाळण्यासाठी विकास निधी

मुक्कामाचा प्रश्न तूर्तास सुटला

‘ती’ नरभक्षक वाघीण सांभाळण्यासाठी विकास निधी
( प्रतिकात्मक छायाचित्र )

मुक्कामाचा प्रश्न तूर्तास सुटला

जंगलव्याप्त क्षेत्राच्या विकासासाठी निधी दिल्यास, वाघीण नरभक्षक असली तरी आम्ही सांभाळण्यास तयार आहोत, असा सूर आमदारांकडून पुढे आल्याने व त्यावर शासनानेही हमी दिल्याने वाघिणीच्या मुक्कामावरील प्रश्नचिन्ह दूर झाले आहे. दरम्यान, चारच दिवसापूर्वी जिल्हय़ात आलेल्या वाघिणीवर देखरेख ठेवण्यासाठी वनखात्याच्या वरिष्ठांसह ५० कर्मचाऱ्यांचा चमू तैनात झाला आहे.

ब्रम्हपुरीच्या वनक्षेत्रात गावकऱ्यांवरील हल्ल्याने चर्चेत आलेल्या वाघिणीचा मुक्काम बोर-२ क्षेत्रात हलविण्यात आल्यानंतर नवाच पेच उद्भवला. वाघिणीच्या आगमनाने बोर व लगतचा परिसर भयग्रस्त झाला. आदिवासींना जगणे कठीण झाल्याची ओरड सुरू झाली. त्याची दखल घेऊन परिसराचे आमदार डॉ. पंकज भोयर व वनक्षेत्राच्या लगतच्या परिसराचे आमदार समीर मेघे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. वनमंत्र्यांनी राज्याचे प्रधान वनसंरक्षक मिश्रांसोबत चर्चा केल्यावर न्यायालयीन निवाडे व तज्ज्ञांच्या सल्ल्याचा दाखला मांडण्यात आला. निर्णय फिरविणे शक्य नसल्याची हतबलता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

नरभक्षक वाघिणीचा मुक्काम बोरमधून हलणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर लोकप्रतिनिधी जनतेच्या रेटय़ामुळे हतबल झाले. यातूनच पुढे विकासाचा मुद्दा निघाला. जंगलव्याप्त क्षेत्र व लगतच्या सेलू तालुक्यातील भयग्रस्त गावांना दिलासा देण्याची बाब पुढे आली. या परिसरातील रस्ते व अन्य सुविधांसाठी शासनाकडे निधीची मागणी झाली. या विषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री मुनगंटीवार यांनी परिसरातील गावांसाठी तात्काळ निधी देण्याची व सुरक्षेची खबरदारी घेण्याची हमी दिली आणि नरभक्षक वाघिणीची भीती दूर झाली.

नरभक्षक वाघिणीला बोरला हलविण्यापूर्वी तिला ठार करण्याचा निर्णय वन्यजीव संस्थांच्या दबावातून मागे घेण्यात आला. वाघिणीसाठी नवा अधिवास शोधणे सुरू झाले. बोर अभयारण्याचे प्रतिबंधित क्षेत्र विस्तीर्ण आहे. नीलगायी, रोही, रानडुक्कर या प्राण्यांची विपुलता असल्याने वाघिणीला खाद्याची चिंता नाही. मानद वन्यजीव संरक्षक आशिष गोस्वामी म्हणाले, या राष्ट्रीय प्राण्याचे स्वागतच करायला हवे. या क्षेत्रात अन्य वाघ नाही. नरभक्षक वाघिणीस हाच परिसर रम्य ठरू शकतो. ती रमली तर ते बोरसाठी वैभवच ठरेल, अशी भूमिका मांडत त्यांनी मानवी संरक्षणाचेही समर्थन केले. वाघिणीच्या मुक्कामावरचे प्रश्नचिन्ह तूर्तास दूर झाले असले तरी भविष्यात उपद्रव दिसून आल्यास वाघिणीला प्राणिसंग्रहालयात हलविण्याचा पर्यायसुध्दा राखीव ठेवण्यात आला आहे. सध्या असणाऱ्या वाघिणीची हालचाल टिपण्यासाठी वनखात्याचा चमू रात्रंदिवस सज्ज आहे. जवळून निरीक्षण करण्यासाठी एक हत्तीण कर्मचाऱ्यांसह उभी आहे. परिसरातील गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या गाठीभेटी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली.

वाघिणीच्या आगमनाने परिसर भयग्रस्त आहे. लोकजीव मुठीत घेऊन जगत आहेत, म्हणून त्यापासून संरक्षण मिळणे आवश्यक ठरते. तसेच आदिवासी व अन्य कामकऱ्यांचे रोजगार ठप्प पडले आहेत. नरभक्षक वाघिणीस सांभळायचे तर लोकांना दिलासा मिळणे अपेक्षित आहे. आता शासनानेच हमी घेतल्याने वाट पाहू, असे आमदार डॉ. पंकज भोयर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2017 1:47 am

Web Title: development fund for tigress help
Next Stories
1 सरपंचांच्या थेट निवडीने सामाजिक दरी रुंदावणार?
2 घोडामैदान दूर असूनही मोर्चेबांधणीला वेग
3 सौरपार्कच्या नुसत्याच निविदा
Just Now!
X