रायगड जिल्ह्य़ात २०१७ हे वर्ष निवडणुका, नसíगक आपत्ती आणि खड्डय़ात गेलेल्या रस्त्यांचे वर्ष ठरले. जिल्ह्य़ातील रस्त्यांची दुरवस्था, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकींचा रणसंग्राम, वर्षांच्या अखेरीस आलेल्या ओखीचा वादळाचा प्रभाव हे मुद्दे चांगलेच गाजले. दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा प्रकरणाचा निकालही चच्रेत राहिला.

रायगड जिल्ह्य़ासाठी सरते वर्ष हे खडतर ठरले. खड्डय़ांत गेलेल्या रस्त्यांची अनुभूती तमाम रायगड करांना या वर्षभरात आली. नादुरुस्त रस्त्यांचा जाच जवळपास वर्षभर सुरू राहिला, अलिबाग तालुक्यातील अलिबाग- रेवस, अलिबाग -रोहा आणि अलिबाग -मुरुड या तिन्ही प्रमुख मार्गासह जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख मार्गाची अक्षरश चाळण झाली होती. त्यामुळे खड्डय़ात आदळत आपटत. निरनिराळी आंदोलने रायगडकरांचे वर्ष सरले. मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रेंगाळलेलेच राहिले. पनवेल ते इंदापुर दरम्यान गेली सात वर्षे रखडलेले महामार्गाचे काम या वर्षांत मार्गी लागेल. अशी अपेक्षा होती. मात्र रायगडकरांची ही अपेक्षा ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाने फोल ठरवली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी सरते वर्ष चांगलेच गाजले. वर्षांच्या सुरूवातीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि नंतरच्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम यांमुळे राजकीय वातावरण तापले होते. जिल्हा परिषद निवडणुकीत शेकाप- राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेत यश आले. पण या निवडणुकीत राष्ट्रवादीची जिल्ह्य़ात सर्वत्र मोठी पिछेहाट झाल्याचे दिसून आले. पक्षाची पिछेहाट होऊनही आदिती तटकरे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. ग्रामपंचायत निवडणुकीतही उत्तर रायगडात शेकापने तर दक्षिण रायगडात शिवसेनेनी आपले वर्चस्व सिद्ध केले.

अवकाळी पाऊस आणि वर्षांच्या अखेरीस आलेले ओखी वादळामुळे रायगड जिल्ह्य़ातील शेती, फळबागा आणि मत्स्यव्यवसायाला फटका बसला. ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास सहा हजार हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले. तर ओखी वादळामुळे झालेल्या पावसाचे दुष्परिणाम आंबा पिकावर पाहायला मिळाले. मोहर येण्याच्या आणि फळधारणा सुरु झालेल्या आंबा पिकाचे यामुळे मोठे नुकसान झाले. ओखीचा सर्वाधिक फटका मत्स्यव्यवसायाला बसला. वादळामुळे ऐन हंगामात मासेमारी सलग चार ते पाच दिवस बंद ठेवावी लागली. यामुळे मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वादळामुळे दुसरीकडे समुद्रात झालेल्या हालचालींमुळे मच्छी खोल समुद्रात मासेमारी करूनही माश्यांची आवक घटली.

दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडय़ात अलिबागच्या सत्र न्यायालयाने पाच मुख्य आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली, तर कटात सहभागी असणाऱ्या तीन महिला आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी आणि पुरावे नष्ट करण्यास मदत करणाऱ्या दोन सोनारांना ९ वर्षे सक्त मजुरी शिक्षा सुनावण्यात आली. विशेष मोक्का न्यायाधिश के. आर. पेठकर यांनी हे आदेश दिले. दरम्यान पोलीस तपासात जप्त केलेली १ किलो २४६ ग्रॅम सोन्याची लगडी सरकारकडे जमा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागून राहिले होते.  रायगड पोलिसांसाठी सरते वर्ष हे संमिश्र ठरले. जिल्ह्य़ातील सर्व पोलीस ठाणे या वर्षांत पेपरलेस झाली. सायबर सेल विभाग कार्यान्वयित झाला. ऑनलाईन तक्रार नोंदणीला सुरूवात झाली. स्टेशन डायरी हा प्रकार इतिहास जमा झाला. पण आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना जिल्ह्य़ात चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. दुर्दैवाने या उकल करण्यात रायगड पोलीस अपयशी ठरले.

पावसाळी पर्यटनासाठी रायगडात आलेल्या पर्यटकांसाठी सरते वर्ष घातक ठरले. पर्यटकांचा अतिउत्साह चांगलाच जीवघेणा ठरला. कर्जत, माणगाव, अलिबाग, मुरुड  येथे १८ हून अधिक पर्यटकांचा बळी गेला. स्थानिकांच्या सुचनांकडे केलेले दुर्लक्ष, पाण्याचा अंदाज न आल्याने या घटना घडल्या, यानंतर काही वर्षांसहलींच्या ठिकाणांवर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केले होते.

कोकण एज्युकेशन सोसायटीने हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले, अलिबागच्या सार्वजनिक वाचनालयालाही यंदा शंभर वर्ष पूर्ण झाली. रायगड किल्ल्यासाठी साहशे कोंटीच्या संवर्धन व विकास आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली. शेतकरी कर्जमाफीचा ९३४ जणांना लाभ झाला, तर प्रोत्साहन अनुदान नऊ हजार शेतकऱ्यांना मिळाले. सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी २ सुसज्ज नौका तटरक्षक दलात दाखल झाल्या. एकुणच सरते वर्ष हे रायगडकरांसाठी संमिश्र फलदायी ठरले. येणारे वर्ष मात्र सुखसमाधानाचे आणि समृद्धीचे येईल हीच अपेक्षा.