राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात ५ टप्प्यात अनलॉकची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्य सरकारनं हा निर्णय अद्याप झाला नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर काही तासातच मंत्री वडेट्टीवार यांनी घुमजाव केलं. “अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही. ५ टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली असून यावरचा अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील.” असं सांगण्याची वेळ राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर आली. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपाच्या हाती आयती संधी मिळाली आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. लॉक-अनलॉक हॅशटॅग करत त्यांनी ट्वीट केलं आहे.

“काय सुरू, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद?” असे संभ्रम उपस्थित करणारे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.

राज्य सरकारचं स्पष्टीकरण

‘करोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. करोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत’, असं राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल’, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’; गोपीचंद पडळकरांची ठाकरे सरकारवर टीका

काय होती वडेट्टीवारांची घोषणा?

गुरुवारी संध्याकाळी विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील जिल्ह्यांची पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी या आधारावर ५ गटांमध्ये विभागणी केल्याची घोषणा केली. यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली असणाऱ्या आणि २५ टक्क्यांच्या खाली ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन पूर्णपणे उठवल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यासोबतच, या पाचही गटांमध्ये ताज्या आकडेवारीनुसार कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्याची यादी देखील त्यांनी यावेळी जाहीर केली.