महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या अर्थात बुधवार दिनांक ४ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील विधानभवन या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

अर्थसंकल्प सोप्या भाषेत असं पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रस्तावना लाभली आहे. राज्याचा  अर्थसंकल्प हा काहीसा किचकट विषय असतो. अनेकदा सामान्यांना त्यातील अनेक तरतुदी, घोषणा, आश्वासनं याबाबतची माहिती या पुस्तकात असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती असणार आहे.

महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाल्यापासून भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षात विस्तव जात नाही. हे महाराष्ट्र पाहतोच आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्य उपस्थिती असणार आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. सकाळी साडेसात-आठ च्या सुमारास झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधीही महाराष्ट्र विसरलेला नाही. औट घटकेचं मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना उपभोगायला मिळालं. मात्र अजित पवारांनी राजीनामा दिल्याने फडणवीस यांनाही राजीनामा द्यावाच लागला. त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.