नानाजी देशमुख यांच्या जन्मगावाचा कायापालट होणार

जिल्ह्यच्या सेनगाव तालुक्यातील कडोळी हे जन्मस्थळ असलेल्या गावचे सुपुत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानाजी देशमुख यांच्या जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संघाचे सरकार्यवाह भयाजी जोशी हे १८ डिसेंबर रोजी नानाजी जन्मशताब्दी समारोह कार्यक्रमानिमित्त येणार आहेत. मुख्यमंत्र्याच्या प्रथम आगमनामुळे या गावचा कायापालट होणार असल्याची चर्चा आहे.

कडोळी हे गाव नानाजी देशमुख यांचे जन्मस्थळ आहे. त्यांच्या जन्मशताब्दी समारोहानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. याच निमित्ताने मुख्यमंत्री व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भयाजी जोशी कडोळीत येणार असल्याने कार्यक्रमाची पूर्व तयारी भाजपाच्या वतीने आमदार तान्हाजी मुटकुळे करीत आहेत.

या कार्यक्रमासंबंधीत ४ डिसेंबर रोजी नागपूर येथे पालकमंत्री दिलीप कांबळे, भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, आमदार तान्हाजी मुटकुळे, मुख्यमंत्र्याचे उपसचिव भीमनवार, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे ब्रिजलाल खुराणा यांच्या उपस्थितीत बठक पार पडली.

कडोळी हे गाव या आधीच िहगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आमदार आदर्श ग्रामयोजना अंतर्गत दत्तक घेतले असून या गावाच्या विकासकामासंदर्भात तसा आराखडा सुद्धा पूर्वीच केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आता मुख्यमंत्र्यासह इतर मान्यवर नानाजींच्या जन्मस्थळाला भेट देणार असल्याने या गावात नानाजी देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामविकास, कौशल्य विकास, ग्रामीण कारागिरांसाठी प्रशिक्षण केंद्र, तसेच स्थानिकच्या मालावर प्रक्रिया उद्योग, असे विविध कामे होणार आहेत.

कडोळी येथे मुख्यमंत्री फडणवीस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्य सरकार्यवाह भयाजी जोशी यांचे आगमन होणार असल्याने नियोजित कार्यक्रमासाठी भाजपचे कार्यकत्रे कामाला लागले आहेत.

नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमातून कडोळी गावाचा कायापालट होईलच, त्यासोबत कडोळीला जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था सुद्धा दूर होईल, असे ग्रामस्थांना वाटते.