भाजप पदाधिकाऱ्यांची शिष्टाई
जिल्ह्यच्या १६ तालुक्यांत वेगवेगळ्या गावांमध्ये दलितवस्त्या सुधारणांसाठी सरकारकडून प्राप्त ३४ कोटी निधीचे नियोजन करताना जि.प.मध्ये अक्षरश: हडेलहप्पी झाल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निधीतून होणारी कामे थांबविण्याची सूचना दिल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनी गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तक्रार केली होती. त्यापाठोपाठ रातोळीकरांसह भाजप युवा नेते राजेश पवार, दिलीप कंदकुत्रे, गंगाधर जोशी आदींनी सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची वर्षां बंगल्यावर भेट घेऊन नांदेड जि.प.तील समाजकल्याण विभागाच्या मनमानी कारभाराबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्ह्याचे संपर्कमंत्री सुधीर मुनगंटीवार तेथे हजर होते. नांदेडच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीनुसार दलित वस्त्यांमधील २७ कामांना स्थगिती देऊन संपूर्ण चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेची अधिकृत माहिती काल सायंकाळपर्यंत येथे आली नव्हती. तथापि शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कारवाईची माहिती ठामपणे सांगितली.
जि.प.ने जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांत दलित वस्त्यांमधील १ हजार ४३९ कामांना अलीकडेच प्रशासकीय मान्यता दिली. याचा अधिकृत आदेश जारी झाल्यानंतर अनेक सदस्यांनी निधीच्या वितरणाबद्दल आक्षेप घेतले आहेत. निधीचे वाटप असमान पद्धतीने झाले असा आरोप केला. गेल्या आठ दिवसांपासून हे प्रकरण गाजत असतानाच जि.प.तील सत्ताधारी आघाडीचे सदस्य रमेश सरोदे यांनी सोमवारी जि.प.समोर उपोषण सुरू केले. सोमवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. मुंबईस गेलेल्या भाजप शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सरोदे यांच्या उपोषणाची माहिती दिली. सर्व प्रकरण ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तक्रारीची गंभीरपणे नोंद घेतली, असे रातोळीकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या भाजप शिष्टमंडळाने जिल्ह्यातील प्रमुख पदांवर अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना होत असलेल्या अनुचित बाबींकडे लक्ष वेधले. देगलूर नगरपालिकेतील मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या बदलीसाठी दोन आमदार प्रयत्नशील आहेत. परंतु पाटील हे चांगले अधिकारी असून त्यांना देगलूरहून बदलू नये, असे गंगाधर जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.