‘हवापाण्या’वर गप्पागोष्टी झाल्या – अजित पवार

राज्यात सत्तानाटय़ानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे प्रथमच सोलापूर जिल्ह्य़ात टेंभुर्णी येथे एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. उभयतांनी सुमारे २०मिनिटे एकमेकांशी हितगूज करीत हास्यविनोदही केले. मात्र त्यांच्यात झालेल्या चर्चेचे गुपित काय होते, याची उत्सुकताही सर्वाना लागली होती. त्यावर अजित पवार यांनीच स्पष्टीकरण देत, फडणवीस यांच्याशी आपल्या ‘हवापाण्या’वर गप्पागोष्टी झाल्याचे सांगत वेळ मारून नेली.

फडणवीस आणि पवार हे दोघे नेते एकत्र येण्यासाठी करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचा विवाह सोहळा निमित्त ठरला. टेंभुर्णी येथे शाही थाटात झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्य़ातून तसेच राज्यातून विविध राजकीय नेते मंडळी आली होती. यात फडणवीस व अजित पवार यांचे एकत्र येणे हा चर्चेचा विषय ठरला होता. भव्य आणि देखण्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर फडणवीस व पवार हे एकमेकांस लागून आसनावर विराजमान झाले होते.

जवळच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दोघे पवार विरोधक एकत्र बसले होते. परंतु सर्वाचे लक्ष वेधले गेले फडणवीस व अजित पवार यांच्या एकत्र येण्याकडे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी दोस्ताना करीत भाजपने सत्ता स्थापनेचा प्रयोग केला होता.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली होती. त्यानंतर केवळ काही तासांतच हे सत्तानाटय़ संपुष्टात आले आणि भाजपचे स्वप्न दुभंगले. या पाश्र्वभूमीवर फडणवीस व अजित पवार या दोघांनी आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात एकत्र येऊन सुमारे २० मिनिटे एकमेकांशी गप्पागोष्टी केल्याचे पाहावयास मिळाले.