News Flash

निर्णायक लढाईसाठी थोडी कळ सोसा

मनमाड शहरासाठी पाण्याची योजना

चलनकल्लोळावर मुख्यमंत्र्यांचा सल्ला; मनमाड शहरासाठी पाण्याची योजना

५०० व एक हजाराच्या नोटा रद्द करत एका रात्रीत काळ्या पैशावर आघात झाला. काळ्या पैशाविरुध्द पंतप्रधानांनी निर्णायक लढाई सुरू केली. मात्र, या संदर्भात सामान्य माणसाने काळजी करण्याचे कारण नाही. तुम्हाला थोडा त्रास होईल, पण आता नकली नोटा संपल्या आहेत. या निर्णायक लढाईत देशात मोठे परिवर्तन होणार आहे, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मनमाड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ गुरूवारी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अनेकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे असे फलक दाखविले. त्यावर आरक्षणाबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आहे.

पंतप्रधानाच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपण मतदान करत आहोत असे समजून नगरपालिकांची सत्ता भाजपच्या हाती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची यादी सादर करत त्यांनी पंतप्रधानांचा ५०० व एक हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगितले. केंद्र व राज्य सरकारची शहरे बदलली पाहिजेत ही भूमिका आहे. त्यामुळे धूळखात पडलेले शहर विकासाचे आराखडे मंजूर करण्यात आले.

राज्य १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला. २०१७ पर्यंत राज्यातील प्रत्येक घरात शौचालय असेल यासाठी निधीही उपलब्ध करून दिला. विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात राज्य सरकार मदत करते. पण त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. राज्याच्या अनेक भागात पाणी समस्या भेडसावत असल्याने सर्व शहरांसाठी पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मनमाडच्या समस्यांवर चिंता व्यक्त करत शहरासाठी पाण्याची योजना तयार केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसेला पुन्हा धक्का

मनसेचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुदाम कोंबडे आणि मोहन मोरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी मनसेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यात कोंबडे यांची नव्याने भर पडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 12:51 am

Web Title: devendra fadnavis comment on black money
Next Stories
1 राज्यात वनहक्क दाव्यांच्या अटी शिथील?
2 सहकारमंत्री देशमुखांच्या अडचणीत वाढ, लोकमंगल समूहाला निवडणूक आयोगाची नोटीस
3 सहकारमंत्री सुभाष देशमुखांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- राष्ट्रवादी
Just Now!
X