मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यात आजच्या तारखेत साडेसतरा लाख मोतीबिंदू रुग्ण आहेत. या रुग्णांसह नव्याने भर पडणाऱ्या सर्व रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून जुलै २०१९ पर्यंत राज्य आजाराने मुक्त केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. माधव नेत्रालय सिटी सेंटरचे रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनासोबतच खासगी क्षेत्रातील १७५ रुग्णालयात रोज किमान १० तास मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत आहेत. आतापर्यंत ५० हजार शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सन २०५० पर्यंत देशात ११ कोटी लोक नेत्ररोगाने ग्रस्त होतील. महाराष्ट्र शासनाने यासाठी सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्यामुळे माधव नेत्रालयाचीही शासनाला मदत होईल. नागपूर शहर हे मेडिकल हब म्हणून पुढे येत आहे. माधव नेत्रालयामुळे यात मोलाची भर पडली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. जगतप्रसाद नड्डा म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्पात ‘आयुष्यमान भारत’ या योजनेच्या माध्यमातून १० कोटी कुटुंबाला पाच लाखाचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे. याशिवाय देशातील दीड लाख आरोग्य उपकेंद्रांना वेलनेस सेंटरमध्ये परावर्तीत केले जात असून त्यातील १२ हजार सेंटर परावर्तीत झाले आहेत. या केंद्रांतून आरोग्य सेवेला आधुनिकीकरणाची जोड  दिली जात आहे. मोहन भागवत म्हणाले की, ‘आपलेपणा’ सेवेचा धर्म आहे. त्यामुळे देशातील संतांनी लोकांना सेवा पुरवणे हे आपले कर्तव्य मानले. याच आपलेपणाची भावना ठेवून सुरू करण्यात आलेल्या या माधव नेत्रालयात गरजूंना डोळ्यासंबंधीच्या रोगांची आधुनिक उपचार पद्धती मिळणार असल्याने त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा.

कार्यक्रमात स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, राज्यसभा सदस्य डॉ. सुभाष चंद्रा यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यांनी, तर संचालन मनीषा काशीकर यांनी केले. आभार डॉ. श्रीकांत अंधारे यांनी मानले.