युतीच्या प्रचाराला कोल्हापुरातून सुरुवात

देश चालवण्यासाठी ५६ पक्षाचे सरकार चालत नाही, तर ५६ इंचाची छाती लागते. ५६ पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला लगावला.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला भक्कम सरकार मिळणार आहे. भाजप-सेना युती अतूट असून ती सत्तेसाठी नाही, तर विचारांची आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत केला. शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षाच्या प्रचाराचा नारळ आज कोल्हापुरात वाढवण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.

सभेला झालेल्या अभूतपूर्व गर्दीचा उल्लेख करून आपण नतमस्तक झालो आहोत, ही युतीच्या विजयाची नांदी आहे, असा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘देशाला समर्थ सरकार मोदींच्याच नेतृत्वाखाली मिळू शकते. काँग्रेस-राष्ट्रवादी ही मॅनेजमेंट कंपनी आहे. विरोधकांना उमेदवार मिळत नाही. ज्यांना उमेदवारी दिली ते ती परत करत आहेत.’ नावात राष्ट्रवाद असला तरी अंगी राष्ट्रवाद येत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आमचा हिंदुत्ववाद जातीधर्माच्या पलीकडे जाणारा आहे. भाजप-सेना युती हा फेविकॉल जोड असून तो कधीही तुटणार नसल्याची हमीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या दहाही जागांवर युतीचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करून माघार घेण्यास अवधी आहे, तोवर कन्या आणि नातवास माघारीची संधी द्यावी, असा सल्ला नावाचा उल्लेख टाळून शरद पवारांना दिला.

या वेळी संजय मंडलिक व धैर्यशील माने या उमेदवारांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे -पाटील यांची भाषणे झाली.

आमचे सरकार आल्यावर राममंदिर उभारू-उद्धव

मोदी पंतप्रधानपदी नकोत म्हणून विरोधक हातात हात घालत आहेत, पण यापैकी कोणाकडेच पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, असा प्रहार करून उद्धव ठाकरे म्हणाले, की शरद पवार, मायावती यांनी तर निवडणुकीपूर्वीच माघार घेतली आहे. जनतेचे भले करण्यासाठी आम्ही युतीच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. आमचे सरकार आल्यावर राम मंदिर निश्चितपणे उभारण्यात येईल.