मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वृत्तपत्रे-प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून राज्य सरकार कायम या चौथ्या स्तंभाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वृत्तपत्र संघटनांच्या कार्यक्रमात दिली. महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटना, विदर्भ डेली न्यूजपेपर असोसिएशन, इल्ना आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

सह्य़ाद्री अतिथीगृहावर झालेल्या या कार्यक्रमास विदर्भ डेली न्यूजपेपर असोसिएशनचे श्रीकृष्ण चांडक, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक गोयंका, लोकमतच्या संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा, पुढारीचे मालक-संपादक प्रतापसिंह जाधव, गुजरात समाचारचे बाहुबली शहा, देशोन्नतीचे प्रकाश पोहरे, टाइम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी शिवकुमार सुंदरम आदी उपस्थित होते. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हार-तुरे स्वीकारले नाहीत.

सरकारचे काही चुकले तर जरूर टीका करा. सरकारने काही चांगले केले तर त्याचे कौतुक करा. यातूनच लोकशाही मजबूत होते. राज्य सरकार कायमच चौथ्या स्तंभाच्या पाठीशी असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इंडियन एक्स्प्रेस समूहाची धुरा सांभाळल्यापासून कोणा मुख्यमंत्र्यांचे जाहीर कौतुक केले नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निर्णयक्षमता, कार्यक्षमता कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत इंडियन एक्सप्रेस समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक गोयंका यांनी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. तसेच पुढील कारकीर्दीत त्यांना यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या.

फडणवीस सरकार वृत्तपत्रांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहिले आहे, असे उद्गार विजय दर्डा यांनी काढले. तर प्रतापसिंह जाधव, श्रीकृष्ण चांडक आणि प्रकाश पोहरे यांनीही यावेळी मुख्यमंत्र्यांचा गौरव केला.