विरोधकांच्या टीकेनंतर अर्थसंकल्पाचा हवाला देत मुख्यमंत्र्यांचा युक्तिवाद

शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची मोदी सरकारची भूमिका सांगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टीकेचे लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराची दिशा इस्लामपूरच्या मेळाव्यात निश्चित केली. शासन शेतकरीविरोधी नाही तर शेतकरी हिताचेच निर्णय घेत असल्याचे सांगण्यातच भाषणाचा सर्वाधिक वेळ देत आगामी निवडणुकीमध्ये सुटाबुटातील सरकार हा आरोप पुसण्याचा त्यांचा प्रयत्न दिसला. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची राष्ट्रवादीशी वाढती जवळीक आणि यामुळे लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघासाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न हा हेतू या दौऱ्यामागे असल्याचे दिसून आले.

इस्लामपूरच्या पोलीस कवायत मदानात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने कृषी महोत्सव आणि दख्खन जत्रा याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आले होते. या निमित्ताने मंत्रिमंडळातील महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुभाष देशमुख, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर आदींची उपस्थिती होती. तसेच जिल्ह्य़ातील भाजपची झाडून सारी मंडळी उपस्थित होती.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना शेतकरी अडचणीत असल्याचे मान्य करीत असताना केंद्र शासनाने दीडपट हमीभाव देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याचे सांगितले. मात्र हे सांगत असताना आज विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करत असल्याचा आरोप करीत २००४ मध्ये प्राप्त झालेल्या स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी पंतप्रधानपद असतानाही मनमोहन सिंग आणि कृषीमंत्री असतानाही शरद पवार यांनी का केली नाही असा सवाल त्यांनी केला.

शेती व्यवसाय अडचणीत असल्याने केंद्र शासनाने गरिबासाठी अर्थसंकल्पात चांगल्या तरतुदी केल्या असून याचे फलित येत्या खरीप हंगामापासून दिसू लागेल असा प्रचारकी थाट या भाषणात होताच, पण याचबरोबर राज्यातील आघाडी सरकारवर निशाणा साधत असताना इस्लामपूर पालिकेला निधी देण्याचा दाखला दिला. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आमदार जयंत पाटील १५ वष्रे सत्तेत असताना इस्लामपूर पालिकेला ११५ कोटी देऊ शकले, मात्र आमच्या सरकारने ११ महिन्यांत १३२ कोटी रुपये विकास कामासाठी मंजूर केल्याचा दावाही त्यांनी केला.

आधीचे सरकार टँकर माफिया होते, यामुळेच दुष्काळ मुक्तीसाठी काम झाले नसल्याचा आरोप करीत असताना या आधीच्या सरकारमधील मंडळींच्या चुकामुळेच आम्हाला जनतेने सत्ता दिली असल्याचे सांगत सहकारी साखर कारखानदारी, शैक्षणिक संस्था या माध्यमातून तिजोऱ्या भरण्याचा उद्योग आधीच्या सत्तेतील मंडळींनी केल्यानेच आम्हाला सत्ता मिळाली. या सत्तेचा वापर केवळ विकासासाठी करण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर आलेल्या सर्वच मंत्र्यांनी विरोधकांना टीकेचे लक्ष्य न करता शासनाने काय केले आहे याचेच मार्केटिंग करण्यासाठीच या व्यासपीठाचा उपयोग केला असल्याचे एकंदरित झालेल्या भाषणावरून दिसून आले. पंकजा मुंडे यांनी नेहमीप्रमाणे फडणवीस यांना लोकप्रिय ठरवीत असताना जानकर आणि सदाभाऊ यांचा बंधू म्हणून केलेला उल्लेख आपला गटनिर्मितीचा त्यांचा प्रयत्न असल्याचे निदर्शक मानले जात आहे. मुंडे, जानकर आदींनी हे शासन गरीबांसाठी काय करीत आहे हे सांगण्यासाठीच जास्तीत जास्त वेळ दिला, तर सहकारमंत्री देशमुख यांनी आपल्या भाषणात साखर कारखानदारी टिकविण्यासाठी साखरेचा बफर स्टॉक करण्याचा घेण्यात आलेला निर्णय शेतकरी हिताचाच असल्याचे आवर्जुन सांगितले.

मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून ओळख असलेले चंद्रकांतदादा मात्र यावेळी कमी बोलले, कारण मतदारांना भेटवस्तू देऊन आपलेसे करण्याचा सांगलीत झालेल्या मेळाव्यात भाजपा कार्यकर्त्यांना दिलेला कानमंत्र वादग्रस्त ठरल्याने त्यांनी राजकीय मौन बाळगण्याला प्राधान्य दिले असले तरी मार्चनंतर शेतकऱ्याला सातबारा ऑनलाइन देण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही आवर्जून सांगितले.

जयंत पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांची राजकीय कोंडी करण्यासाठी या मेळाव्यात जयंतराव विरोधकांना व्यासपीठावर सन्मानाचे स्थान देण्यात आले हेते. वाळव्याचे वैभव नायकवडी, पेठचे नाना महाडिक यांना एकत्र आणून लोकसभेसाठी राजू शेट्टी यांना पर्याय मिळतो का याची चाचपणी या मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. खा. शेट्टी यांची अलीकडच्या काळात राष्ट्रवादीशी वाढलेली जवळीक, विधानसभेच्या विद्यमान काही जागांना धोकादायक ठरू शकते याची जाणीव फडणवीस यांना झालेली दिसते. विशेषत शिराळ्यात याचे परिणाम दिसण्याचा धोका आहे. यामुळेच जयंतराव विरोधकांना ताकद देण्याचा हा प्रयत्न होता.