राज्यामध्ये अपूर्ण सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्याचे ध्येय राज्य शासनाने समोर ठेवले आहे. मागील काळात निधी अभावी रखडलेले, भूसंपादनाच्या फेऱ्यात फसलेले असे अपूर्ण प्रकल्प शासन बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून केंद्रीय अर्थसहाय्याने पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये पश्चिम वऱ्हाडातील अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे निश्चितच कायापालट होईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम व बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे बळीराजा जलसंजीवनी योजनेचा कार्यान्वितीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय महामार्ग भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, खा.संजय धोत्रे, खा. प्रतापराव जाधव, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, आ.गोपीकिशन बाजोरिया आदी उपस्थित होते.

घरकूल योजनेतंर्गत ग्रामीण व शहरी भागातील पात्र बेघर नागरिकांना त्यांच्या गरजेप्रमाणे घरकुले देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात उत्तम रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणली आहे. योजनेनुसार कंत्राटदारावरच रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शेती उत्पादनाला जास्तीचे दर मिळावे हे  शासनाचे प्रयत्न असतात. केंद्र सरकारने उडीद, हरभरा, सोयाबीनवरील आयात शुल्क वाढविले. तसेच निर्यात बंदी उठविली. त्यामुळे शेती उत्पदनांना वाढीव भाव मिळत आहे. मात्र मुबलक पाणी, सूक्ष्म सिंचन व नवीन पीक पद्धती अवलंबल्यास शेती फायद्याची ठरते. बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे सी प्लेनची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गिरगांवच्या समुद्रावरून सी प्लेन शेगांव येथे आनंद सागरमध्ये उतरेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नांदुरा येथे खुच्र्याची फेकाफेक

नांदुरा येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमापूर्वी दोन गटांत वाद झाला. यावेळी सभेच्या ठिकाणी खुच्र्याची फेकाफेक करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करून गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी सभेमध्ये काळे झेंडे दाखवत विदर्भ राज्यासाठी मागणी करण्यात आली. सभा सुरू होण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने पोलिसांनी वेळीच उपाययोजना केली. या ठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खामगांव येथे नेत्यांना काळे झेंडे दाखविण्यापूर्वीच सभेच्या आधी काँग्रेसच्या व मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. अकोला जिल्ह्यतील अकोट व इतर भागातही शिवसेना, शेतकरी जागर मंच आदींसह काही संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कार्यक्रमापूर्वीच ताब्यात घेतले.