मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २९) प्रथमच नगर जिल्हय़ात येत आहेत. जिल्हय़ात तीव्र दुष्काळी परिस्थिती असली तरी त्यांचा पहिला दौरा होत आहे तो विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात व त्यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी लोणीत. हा विरोधाभास टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हय़ातील पदाधिकाऱ्यांनी नगर शहरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र फडणवीस यांच्याकडून या कार्यक्रमांना कात्री लावली गेल्याचे समजले.
गुरुवारी सायंकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेला नव्हता. मुख्यमंत्र्यांनी विखे यांचा कार्यक्रम स्वीकारल्याचे गेल्याच आठवडय़ात स्पष्ट झाले होते. त्यानुसार लोणीतील साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिका छापून त्याचे वितरणही सुरू झाले होते. हे लक्षात येताच भाजपच्या जिल्हा संघटनेने घाई करत मुख्यमंत्री शनिवारी जिल्हा दौऱ्यावर येत असल्याचे व त्यांच्या हस्ते पालकमंत्री राम शिंदे यांच्या सावेडी भागातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री शिंदे यांचा जिल्हा प्रशासनास जो दौरा प्राप्त झाला होता, त्यात केवळ मुख्यमंत्र्यांच्या दोनच कार्यक्रमांचा समावेश होता. शनिवारी सकाळी ९.३० ते १०.३० वाजता शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत लोणीतील पुरस्कार वितरणास उपस्थिती. नगरच्या कार्यक्रमास १ तासाची वेळ तर विखे यांच्या कार्यक्रमास ३ तासांची वेळ. यामध्ये भाजप पक्षसंघटनेच्या कार्यक्रमाला कोठेही स्थान नव्हते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा आयोजित करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी पक्षाचे पदाधिकारी मुंबईत जाऊन आले. मात्र या मेळाव्याला दौऱ्यात थारा मिळाला नाही. संपर्क कार्यालय दोन महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे, मात्र त्याचे उद्घाटन आता होत आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यालयाचीच संभाजी ब्रिगेडने आंदोलन करत तोडफोड केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून त्याला पक्षाने विशेष महत्त्व दिले आहे.
जिल्हय़ात दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषत: दक्षिण भागात पिण्याचे पाणी, चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. चारा डेपो, छावण्या सुरू करण्याची मागणी सुरू आहे. राज्य सरकारने तीन दिवसांपूर्वी लगतच्या जिल्हय़ात छावण्या उघडण्यास परवानगी दिली. मात्र जिल्हा सरकारच्या मदतीवाचून कोरडाच राहिला आहे. दुष्काळाच्या प्रश्नालाही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात स्थान मिळालेले नाही. या विरोधाभासाला तोंड देताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत. दुष्काळाच्याच प्रश्नावर विरोधी पक्षनेता विखे यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा केली, त्यांनीच आता मुख्यमंत्र्यांना दुष्काळाऐवजी पुरस्कार वितरणासाठी निमंत्रित केले, असे समर्थन भाजपचे पदाधिकारी करू लागले आहेत.