रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती आहे मात्र कुठे जायचं ते मागे बसलेले ठरवतात असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर नेमक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यांना आई भवानी दीर्घायुष्य देवो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. मात्र सामनाला मुख्यमंत्र्यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीतल्या वक्तव्यावरुन त्यांनी टीकाही केली. महाराष्ट्र भाजपाच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

आणखी वाचा- “यांना इतकंही माहिती नाही”; उद्धव ठाकरे, राऊतांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर

महाविकास आघाडीवर कायम तीन चाकांचं सरकार आहे अशी टीका विरोधकांनी केली. त्यावरुन शिवसेना खासदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते की होय आमचं सरकार तीन चाकी आहे. रिक्षा आहे, गोरगरीबांचं सरकार आहे. ज्याचं स्टिअरिंग माझ्या हाती आहे. जनतेने दाखवलेला विश्वास हेच माझं बळ आहे. तीन चाकी तर तर तीन चाकी तिन्ही चाकं एका दिशेने चालत आहेत हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. असं म्हणत त्यांनी भाजपाच्या टीकेला उत्तर दिलं होतं. मात्र आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या स्टिअरिंग वक्तव्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

आणखी वाचा- महाराष्ट्रात शत-प्रतिशत भाजपासाठी तयारीला लागा, केंद्रातून आदेश

ऑटो रिक्षाचं स्टिअरिंग हे उद्धव ठाकरेंच्या हातात आहे, पण कुठे जायचं ते मागे बसलेले ठरवतात अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर हे सरकार पाडण्यात आम्हाला काहीही रस नाही. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडाण्यासाठी सक्षम आहात असंही फडणवीस यांनी सुनावलं आहे.