राज्यातील करोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागातील रुग्णालयांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या.

रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पनवेल, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर अशा सर्वच ठिकाणी संसर्ग प्रमाण अधिक आहे. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील रुग्णसंख्येत मुंबई आणि एमएमआरमधील ७० टक्के रुग्ण, तर मृत्यू सुद्धा याच भागात अधिक आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत चाचण्या वाढविण्याची गरज आहे. तसेच त्याचे अहवाल तात्काळ आले पाहिजेत,” अशी सूचना फडणवीस यांनी केली.

आणखी वाचा- सरकार पडणार?, मराठा आरक्षण व सारथी; तिन्ही प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“मृत्यूदर वाढणे ही बाब अधिक चिंताजनक आहे. राज्यातील महापालिकांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात मिळायला दिली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयांकडून लूट थांबविणे आवश्यक आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आयसीसीयू बेड कमी पडत आहेत. दुसरीकडे रुग्ण व्यवस्थापनही कमी पडत आहे. आरोग्य सेवकांची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, ठाण्यातून २ ते ३ रुग्ण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे नातेवाईक मला आज भेटले. देशातील संसर्गापेक्षा महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाण फारच अधिक आहे. प्रति १० लाख लोकसंख्येमागे चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात नवव्य क्रमांकावर आहे. कमी चाचण्या हेच महाराष्ट्रातील कोरोना वाढ होण्यामागील मुख्य कारण असून, सातत्याने सांगतो आहे. अजूनही खरी मृत्यूसंख्या पुढे आलेली नाही. मुंबईतील ४०० मृत्यू आणखी पुढे आलेले नाहीत,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.