“देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस आहे. ते सहन करतात म्हणून त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचं, त्यांनी आता छाती फाडून दाखवायची का?” असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते. विधान परिषदेच तिकिट नाकारल्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हा मुद्दा मांडला.

आणखी वाचा- करोना संपल्यावर काँग्रेसमध्ये भूकंप होणार; चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

मार्चमध्येच विधान परिषदेचे उमेदवार ठरले होते तसेच खडसे यांच्याबद्दल केंद्राला योग्य माहिती दिली गेली नाही हे दोन्ही आरोप चुकीचे आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले. “मी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी एकनाथ खडसे, बावनकुळे व पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकिट मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. चार-पाच मे रोजी जेव्हा नाथाभाऊंना तिकिट मिळणार नाही याची कल्पना आली तेव्हा पर्यायी उमेदवार तयार ठेवायला नका का? उमेदवारीचा फॉर्म भरता आला नसता, नाचक्की झाली असती. म्हणून अन्य उमेदवारांना मुंबईत आणलं” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आणखी वाचा- RSS च्या अजेंड्यात नाथाभाऊ न बसल्याने तिकिट नाकारलं – चंद्रकांत पाटील

“केंद्रीला चुकीची माहिती दिली असं नाथाभाऊंच म्हणणं असेल तर तुम्ही केंद्राकडे जाऊ शकता, त्यांना जाब विचारा. आमच्याकडे पंतप्रधान मोदींपासून अमित शाहंपर्यंत सर्वांशी सहज संपर्क साधता येतो” असे पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली पण आता त्यांनी पालक, मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावं असे चंद्रकात पाटील यांनी सांगितले.