News Flash

जनमानसात अस्वस्थता… तत्काळ पावलं उचला; फडणवीसांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

कडक निर्बंधासंदर्भात नव्याने अधिसूचना काढण्याचा सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. (संग्रहित छायाचित्र)

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे ठाकरे सरकारचं लक्ष वेधलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं असून, लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे जनमानसात अस्वस्थता आहे. त्यामुळे तातडीने पावलं उचलून त्यांना दिलासा देण्याबद्दल नव्याने अधिसूचना काढण्याचा सल्ला दिला आहे.

राज्य सरकारने करोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध आणि वीकेंड लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून (५ एप्रिल) नव्या नियम लागू करण्यात आले असून, त्याला काही ठिकाणी विरोध होतानाही दिसत आहे. नागपूर आणि पुण्यात काही व्यावसायिकांनी रस्त्यावर येत आंदोलन केलं होतं. हाच मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना तत्काळ भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले आहेत फडणवीस?

प्रति
उद्धव ठाकरेजी

करोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ काही पाऊले उचलून सर्वसामान्यांना दिलासा देण्याबाबत…

महोदय,

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाउनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शवली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाउन सदृश्य निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करताहेत.

हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाउनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणं आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर वाहतूक खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअर्स पार्टस दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत.

त्यामुळे माझी विनंती आहे की, पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. करोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच. पण, करोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलाल, असा विश्वास वाटतो.

-देवेंद्र फडणवीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 5:43 pm

Web Title: devendra fadnavis letter to uddhav thackeray about new rules and guidelines bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच अनिल देशमुखांचं ट्विट; म्हणाले…
2 उद्धव ठाकरेंच्या मागणीला आनंद महिंद्रांचा पाठिंबा; केलं ट्विट
3 राष्ट्रवादी भाजपाला देणार धक्का; काळे अजित पवारांच्या उपस्थितीत करणार प्रवेश
Just Now!
X