नगर परिषद निवडणूक

नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रचाराचा वेग वाढू लागला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांमुळे प्रचारात रंगत येणार आहे.

रत्नागिरी शहर व जिल्हा मिळून चार नगर परिषदा आणि एका नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या २७ नोव्हेंबरला होत आहे. भाजपा-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या चार प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच अनेक अपक्ष उमेदवार  निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या सर्व उमेदवारांचा घरोघर प्रचारावर भर असला तरी प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या राज्य पातळीवरील नेत्यांच्या जाहीर सभाही आयोजित केल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी (२० नोव्हेंबर) येथे येत असून प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सकाळी ११वाजता त्यांची प्रचार सभा होणार आहे. त्यापूर्वी येत्या शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) संध्याकाळी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांसाठी संयुक्त प्रचारसभा येथील आठवडा बाजारात होणार आहे. शिवसेनेच्या मात्र कोणाही राज्यस्तरीय नेत्यांची सभा अजून निश्चित झालेली नाही.

भाजपा व सेना सर्व नगर परिषदांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवत आहे, तर  रत्नागिरी, राजापूर आणि खेड या तीन ठिकाणी काँग्रेस आघाडीतर्फे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. चिपळूणमध्ये मात्र दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपाच्या दृष्टीने रत्नागिरी नगर परिषद निवडणूक सर्वात प्रतिष्ठेची असून मावळत्या सभागृहात सेना पहिल्या क्रमांकावर आहे. ते स्थान मिळवण्याबरोबरच थेट निवडणुकीद्वारे नगराध्यक्षपद जिंकण्यासाठीही भाजपाने कंबर कसली आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी नगरविकास खातेही सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे.  जिल्ह्यात काँग्रेस आघाडीची ताकद फारशी नसली तरी रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े कडवे आव्हान उभे करू शकतात, हे लक्षात घेऊन राणे व तटकरेंची संयुक्त सभा येथे आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

या पाश्र्वभूमीवर सेनेची मुख्य मदार मात्र स्थानिक नेते व कार्यकर्त्यांवर असून चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या तीन ठिकाणी असलेले पक्षाचे आमदार अनुक्रमे सदानंद चव्हाण, उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यासह खासदार विनायक राऊत निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. भाजपाप्रमाणेच सेनेनेही रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदावर विशेष लक्ष केंद्रित केले असून माजी उपनगराध्यक्ष राहुल पंडित या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारावर त्यांची भिस्त आहे.