25 September 2020

News Flash

भिलार देशात आपली ओळख प्रस्थापित करेल

भारतातील पहिल्या पुस्तकाच्या गावाचे उद्घाटन

‘पुस्तकांचे गाव’ या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळय़ात भिलार गावचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सरपंच वंदना भिलारे यांनी हे सन्मानपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारले.

भारतातील पहिल्या पुस्तकाच्या गावाचे उद्घाटन

थंड हवेच्या ठिकाणी वसलेले भिलार हे गाव यापूर्वी स्ट्रॉबेरीच्या नावाने ओळखले जायचे. आता ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून ओळखले जाणार असून, भिलारवासीयांनी या निमित्ताने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपली आगळी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. यापुढे सहलीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून या गावाकडे निश्चितपणे पाहिले जाईल. तथापि, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व समृद्ध करण्यासाठी साहित्यिक व प्रकाशकांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रम घडवून आणावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारतातील पहिल्या पुस्तकाच्या गावाचे उद्घाटन आज भिलार येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्रीमती श्वोता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सभापती रुपाली राजपुरे, सरपंच वंदना भिलारे, बाळासाहेब भिलारे, विक्रम पावसकर, अतुल भोसले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे वाचन संस्कृती कमी होते की काय, अशी भीती व्यक्त होत असताना, भिलार वासीयांनी चांगला संदेश या निमित्ताने दिला आहे. आज गावामध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक गावात आले आहेत. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळीने गाव सजले आहे. भिंतीवर बोलके चित्र काढलेले आहे. जो कोणी गावात येईल, तो या गावाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, ‘या गावातील प्रत्येक घर सदासर्वकाळ पुस्तकाचे घर असणार आहे. या गावातल्या लोकांनी पुस्तकालाच आपले कुटुंब मानले आहे. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने’ याचा प्रत्यय या गावातल्या लोकांनी आपल्या कृतीतून दाखविला आहे. या ठिकाणी येणाऱ्यांसाठी यापुढे स्ट्रॉबेरीची चव व वाचनाची भूक भागविण्याची नामी संधी मिळणार आहे.’

महाराष्ट्रात वाचन संकृती नवीन नाही. मराठी ही भाषा समृद्ध आहे. या भाषेचे आकर्षण अन्य भाषकांनाही राहिलेले आहे. मराठीची प्रशंसा अन्य भाषेतील साहित्यकांनी वेळोवेळी केली आहे. मराठी भाषेवर जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा अन्य भाषेवर होत नसावी, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, की मराठी भाषेत जेवढी संमेलने होतात, तेवढी अन्य भाषेत पाहायला मिळत नाहीत. आज भिलार वासीयांनी नवीन पाउल टाकत असताना इतिहास देखील रचलेला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला येणारा पर्यटक भिलारला भेट दिल्याशिवाय जाणार नाही.

तावडे यांनी भिलार गावचे सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या प्रतिसादामुळे ही संकल्पना साकार झाल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील मुलांची सृजनशीलता वाढावी यासाठी इथल्या सहलींचे नियोजन देखील केले जाईल. मुलं या गावात  येतील. इथली साहित्य व संस्कृती सोबत घेऊन जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने झाले. याशिवाय ‘पुस्तकांचं गाव भिलार’ यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. या चित्रफितीतून भिलारवासीयांनी दाखविलेल्या औदार्याची माहिती दाखवली. मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी भिलारच्या सरपंच वंदना भिलारे यांच्या निवासस्थानी जाऊन आणि काही घरांना भेटी देऊन मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाची माहिती जाणून घेतली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 2:46 am

Web Title: devendra fadnavis on bhilar village
Next Stories
1 इतर धान्य खरेदीही बंद, सरकारी घोषणा कागदावरच
2 सिंधुदुर्गातील गोदामात भात पडून!
3 नक्षलवाद्यांनी घेरलेल्या जवानांचा जोरदार प्रतिकार
Just Now!
X