दळणवळणाच्या पायाभूत सुविधा रस्ते विकासासाठी आवश्यक आहेत, त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकारने कोकणात पायाभूत सुविधांची १ लाख कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. नियोजनपूर्वक व कालबद्ध रीतीने होत असलेल्या या कामामुळे येत्या दोन वर्षांत कोकणचा कायापालट होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कुडाळ येथे केले.

केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने मुंबई- गोवा  राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचा भूमिपूजन समारंभ  शुक्रवारी कुडाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गिते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री दीपक केसरकर, बंदरे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, रश्मी ठाकरे उपस्थित होते.

कोकणातील निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण करून निसर्गाला मान्य असलेला विकास करून कोकणवासीयांची प्रगती आणि उन्नती साधण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, कोकणामध्ये निसर्ग, समुद्रकिनारा चांगला असून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पर्यटनवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पर्यटनाला अधिक वाव मिळावा यासाठी पंचतारांकित हॉटेल निर्मितीबरोबरच विमानतळ विकासासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे.

राज्य व केंद्र शासन कोकणच्या विकासासाठी अधिक संवेदनशील असून कोकणचा विकास, परिवर्तन आणि पर्यटन या गोष्टीस प्राधान्य दिले आहे. कोकणातील छोटय़ा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी चांदा ते बांदा या योजनेला गती दिली जाईल, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. या जिल्ह्य़ात पर्यटन वाढावे यासाठी केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शनमध्ये प्रस्ताव पाठविला असून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून टुरिस्ट सíकट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कोकणवासीयांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे असून कोकणच्या सर्वागीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या प्राधान्यक्रमाने  केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोकणात रस्ते, रेल्वे आणि बंदर विकासाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवून  नवनव्या  उद्योगांबरोबरच पर्यटन विकासाला अधिक चालना देऊन रोजगार निर्मिती करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, रेल्वे व रस्ते विकासाचे मोठे जाळे निर्माण करून दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांत अडीच पटीने केले आहे. मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे  कोकणवासीयांचे, लोकप्रतिनिधींचे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होत असल्याचे ते म्हणाले.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखून कोकणचा विकास करण्यावर शासनाने अधिक भर दिला आहे. या पायाभूत सुविधांमुळे कोकणातील पर्यटन व्यवसाय जगाच्या नकाशावर झळकविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

मुंबई- गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणच्या विकासाकरिता सर्वार्थाने महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करून श्री. गडकरी म्हणाले, या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ११ पॅकेज तयार केली असून १४ पुलांची कामे सुरू केली आहेत. या महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल केवळ १६५ दिवसांत पूर्ण केला आहे या कामी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी केले. या महामार्गामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन अनेक लोकांचे प्राण वाचतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिक शेतकऱ्यांना अधिक मोबदला  देण्याची तयारी शासनाने ठेवली, त्याकरिता कोकणातील तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे ३१०० कोटी रुपये दिले असून अॅवॉर्ड होतील तसे मोबदला देण्याची  प्रक्रिया गतिमान केली आहे. येत्या तीन महिन्यांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०१८पर्यंत हा रस्ता पूर्ण केला जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

रस्ते, रेल्वे वाहतुकीबरोबरच जलवाहतुकीसही शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून श्री.गडकरी म्हणाले, आज मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील १५४ कि. मी. लांबीचे रस्ते चौपदरीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी ४४७० कोटी ७२ लाख  रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सागरी मार्गातील  २३ पकी १८ पूल बांधले असून उर्वरित जलमार्गाचा विकास केला जात आहे. यामध्ये खाडय़ा व नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्यात येत आहे. महाराष्ट्रासाठी  जेवढी बंदरे बांधायची असतील त्यांचे प्रस्ताव द्या. त्यांना मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कोकणातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पेट्रोल, डिझेलऐवजी एलएनजी इंधन म्हणून वापरणे उपयुक्त आहे. यापुढे इलेक्ट्रिकल, बायोडिझेल तसेच बायो इथेनॉलला मान्यता देऊन वाहतूक करण्याचा संकल्प त्यांनी या वेळी व्यक्त केला.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, कोकणात रेल्वे, रस्ते आणि बंदराच्या विकासाची कामे हाती घेऊन कोकणचा विकास केला जात आहे. यासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. रेल्वे विकासापासून दुर्लक्षित असलेल्या भागावर अधिक लक्ष केंद्रित केले असून कोकणला पश्चिम महाराष्ट्र जोडण्याबरोबर वैभववाडीपासून रेल्वेने बंदरे जोडली जातील यासाठी रेल्वे विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात विशेषत: कोकणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे  म्हणाले, कोकणात रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाचे केंद्र आणि राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोकण हे जगातील पर्यटनाचे केंद्र होईल. कोकणाला  लाभलेले समुद्रकिनारे, गडकिल्ले यांच्या विकासाबरोबरच चौपदरीकरणाच्या कामांमुळे कोकणच्या पर्यटनाला नवी दिशा मिळेल.

केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गिते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव अजय संगणे यांनी स्वागत केले. खासदार विनायक राऊत यांनी प्रास्ताविक केले. समारंभास कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

 

जन शिक्षण संस्थानचे कार्य उल्लेखनिय – मुख्यमंत्री

सावंतवाडी :  कौशल्य विकास अंतर्गत गेले काही वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात जन शिक्षण संस्थानने सातत्याने उत्तम व उल्लेखनिय कार्य केले आहे. एक लाखावर लाभार्थीना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन चाळीस हजार लाभार्थीना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. जन शिक्षण संस्थानच्या या राष्ट्रीय कार्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन करतो. असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कुडाळ येथे बोलताना काढले. कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित मानव साधन विकास संस्था, मुंबई संचलित जन शिक्षिण संस्थानच्या र्सिोस सेंटर इमारतीचे भूमिपूजन व कॉलेज ऑफ नìसग आणाव यांच्या बहुउद्देशिय सभागृहाच्या उद्घाटन समारंभात श्री. फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या संमारंभास केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री दिपक केसरकर, बंदर विकास राज्य मंत्री रिवद्र चव्हाण, रश्मी ठाकरे, उमा प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वयोगटातील आहे. या तरुण-तरुणींसाठी रोजगाराचे महत्त्व लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासासाठी विविध योजना कार्यान्वित केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जन शिक्षण संस्थानच्या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळत आहे.  हे संस्थानचे कार्य उल्लेखनिय आहे.  उमा प्रभू या सक्षमपणे या संस्थानचा कार्यभार सांभाळत आहेत. असे कौतुकपूर्ण उद्गार काढून मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणात या संस्थानच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. प्रारंभी संस्थानचे अध्यक्ष डॉ. शरद सामंत यांनी प्रास्ताविकात जन शिक्षण संस्थानच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी जन शिक्षण संस्थानच्या कार्याचा परिचय करुन देणारी चित्रफित दाखविण्यात आली. शेवटी नकुल पास्रेकर यांनी आभार मानले.  समारंभास आमदार वैभव नाईक, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, राजन तेली, अतुल काळसेकर, काका कुडाळकर तसेच महिला व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.