नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यानंतर आज देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करणार आहेत. अण्णा हजारे यांच्या भेटीला जाण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली.

माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुणे विमानतळावरून अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धीला रवाना झाले. जाण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. यावेळी भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. फडणवीस म्हणाले,”मागील आठवडाभरापासून अण्णा हजारे यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. आज अण्णा हजारे यांच्याकडे जाऊन चर्चेतून निश्चित मार्ग काढणार आहोत. तसेच अण्णांनी उपोषणाला बसावे, असं कोणाला कधीच वाटत नाही. त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्याबद्दल अण्णांना कळविले देखील आहेत. त्यावर उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. अण्णा हजारे यांचा मूळ मुद्दा असा आहे की, आयोगाला अधिकची स्वायत्तता दिली पाहिजे. उच्चाधिकार समिती नेमली पाहिजे,” असं फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे यांच्या आगामी अयोध्या दौऱ्याविषयीही फडणवीस यांनी भाष्य केलं. त्यावर फडणवीस म्हणाले, “अयोध्येत सर्वानी जायला पाहिजे. प्रभू राम हे आपलं आराध्यदैवत आहे. तेथील वाद संपवून भव्य असं राम मंदिर उभारलं जाणार आहे. त्यामुळे मला आनंद असून, त्यांनी ही गेले पाहिजे आणि सर्वानी तिथे गेले पाहिजे, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- मुंबईकरांना मोठा दिलासा! एक फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल

मुंबई लोकलच्या वेळेचा विचार करायला हवा…

मुंबईत १ फेब्रुवारीपासून लोकल सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेत असतानाच सरकारनं विशिष्ट वेळा निश्चित केल्या आहेत. यावर बोलताना फडणवीस म्हणाले,”आता टप्प्याटप्प्याने लोकल सुरू केली पाहिजे. लोकल पूर्णपणे सुरू नसल्याने नोकरदार, खासगी क्षेत्रातील व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वेळेच्या बाबतीत विचार करायला हवा,” असं फडणवीस म्हणाले.