06 August 2020

News Flash

“संजय राऊत यांनी १२ आमदारांची काळजी करू नये, त्यांनी…”; देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला

तर मला अधिक आनंद झाला असता

शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत. (फोटो सौजन्य : पीटीआय)

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून अनेकदा सरकार अस्थिरतेच्या चर्चांना सुरू होताना दिसल्या. रविवारी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी याविषयी एका लेखातून भाष्य केलं. राज्यातील सरकार पाडण्याच्या पैजा लागल्या आहेत, असं संजय राऊत यांनी लेखातून म्हटलं होतं. राऊत यांच्या विधानावरून पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना सल्ला दिला आहे.

संजय राऊत यांनी रोखठोक सदरात लिहिलेल्या लेखावरून रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात सरकार अस्थिरेच्या चर्चेनं डोकं वर काढलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास सरकार पाडण्याची तयारी होत असल्याचा धक्कादायक दावा केला होता. सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्या आहेत, असं राऊत म्हणाले होते. या विधानावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना सल्ला दिला आहे.

“मला असं वाटतं की, संजय राऊत यांनी १२ आमदारांची काळजी करू नये. त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी. त्यांनी करोना रुग्णांची काळजी करावी. ज्यांना उपचार मिळत नाही, अशा करोना रुग्णांचं काय होणार? असा प्रश्न त्यांनी विचारला असता तर मला अधिक आनंद झाला असता,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

विधान परिषदेवर राज्यपालांच्या सहीने १२ जणांची नेमणूक होईल, पण सध्याचे राज्यपाल या नेमणुका करण्यास अनुकूल नाहीत असे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध झाले. ते चिंताजनक आहे. सरकारने १२ सदस्यांच्या शिफारसी केल्या तरी राज्यपाल या शिफारसींवर तत्काळ सही करणार नाहीत. १५ जूनला सर्व १२ सदस्यांची मुदत संपली व या जागा रिक्त झाल्या. त्या तत्काळ भरल्या तर नवे सदस्य कामाला लागतील. पण करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नामनियुक्त आमदारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी सरकारला दिले आहेत. हे खरे असेल तर १२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर अशा पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्राचे सध्याचे सरकार पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. नंतर येणारे सरकार नामनियुक्त १२ जणांच्या नेमणुका करेल, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाल नावाची घटनात्मक संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 7:02 pm

Web Title: devendra fadnavis reaction on sanjay raut article bmh 90
Next Stories
1 येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
2 राज्यातील हॉटेल्स लवकरच सुरु होणार, नव्या कार्यपद्धतीवर काम सुरु – मुख्यमंत्री
3 कोकण विभागात अतिवृष्टी, ठाण्यात सर्वाधिक ३८० मिमी पाऊस
Just Now!
X