महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण स्थान असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) आठवा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने आज सोशल मीडियावर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. #BalasahebThackeray हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होत आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मात्र या शुभेच्छा देताना फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

“आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन..”, असं फडणवीस यांनी बाळासाहेबांचा फोटो ट्विट करत म्हटलं आहे.

त्याचबरोबर अन्य एका ट्विटमध्ये फडणवीस यांनी बाळासाहेबांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला फडणवीस यांनी बाळासाहेबांचा उल्लेख, “विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम,” असा केला आहे. या कॅप्शनच्या माध्यमातून फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. बिहार निवडणुकींमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रामधील शिवसेना- भाजपाची युती तुटल्यासंदर्भातील चर्चा पुन्हा होऊ लागल्या. मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या वाटपावरुन भाजपा शिवसेनेत पडलेली फूट ही दिलेला शब्द न पाळल्याचे झाल्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर अनेकदा यावरुन दोन्ही पक्षांनी एकमेकांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आलं. बिहारमधील निवडणुकानंतरही भाजपाने आम्ही नितीश कुमार यांना शब्द दिल्याने तो पाळला. महाराष्ट्रात आम्ही शब्द दिलाच नव्हता असं सांगत शिवसेनेवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर आता फडणवीस यांनी पुन्हा एकदा, “विधानांवर ठाम” असा बाळासाहेबांचा उल्लेख करुन शिवसेनेला डिवचलं आहे.

फडणवीसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांची भाषण हा संवाद होता. आपलं म्हणणं खणखणीतपणे आणि लोकांना पटेल असं मांडायचं. त्यांच्या मनात असेल ते बोलायचे. त्यांच्याकडून कोणी बोलवून घेऊ शकत नव्हतं, हीच त्यांच्या भाषणाची वैशिष्ट्यं होती, असं फडणवीस सांगताना दिसत आहेत.