अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी बिहारच्या राजकारणात प्रवेश केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये पांडे यांनी प्रवेश केला असून, निवडणुकही लढवणार आहेत. पांडे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसनं बिहारचे भाजपा प्रभारी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवास यांना सल्ला दिला आहे.

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपास शंका उपस्थित करत आरोप केले होते. त्याचबरोबर हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला आहे.

पांडे यांनी नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये प्रवेश केला असून, त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं वृत्त आहे. पांडे यांच्या जदयूतील प्रवेशानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली असून, बिहारचे प्रभारी असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्लाही दिला आहे.

“देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना, जर मुंबई पोलिसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या ना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही, तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल,” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

गुप्तेश्वर पांडे बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, त्यांच्याकडून याचा इन्कार केला जात होता. अखेर काल (२७ सप्टेंबर) पांडे यांनी नितीश कुमार यांच्या घरी जाऊन जदयूमध्ये प्रवेश केला. या राजकीय प्रवेशानंतर ते निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.