आत्मपरीक्षण करण्याचा पवारांना सल्ला

कुणावर दबाव टाकून पक्षात घ्यावे, अशी भाजपची स्थिती नाही. सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कारवाई सुरू असणाऱ्यांना भाजपमध्ये घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले. नेते पक्ष सोडून का चालले आहेत, याचे शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भाजप पक्षांतरासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. पण त्यातून काही निवडक लोकच आम्ही भाजपमध्ये घेणार आहोत. ‘ईडी’ची कारवाई सुरू असणाऱ्यांना भाजपमध्ये घेणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाजप कुणाच्या मागे जात नाही. इतर पक्षाचे नेतेच आता भाजपमागे येतात. त्यामुळे जे चांगले आहेत, जनतेसाठी कामे करणारे आहेत, त्यातल्या निवडक नेत्यांनाच आम्ही घेऊ . भाजपने कधीही दबावाचे राजकारण केले नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या पाच वर्षांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कारखाने अडचणीत होते. त्यावेळी सरकार आणि राज्यबँकेच्या माध्यमातून आम्ही मदत केली. त्यांना काही भाजपमध्ये या, असे आम्ही सांगितले नाही. अशी यादी फार मोठी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.