राज्यात MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयावर निशाणा साधला आहे. “असं केल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे”, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत. १४ मार्च रोजी MPSC ची पूर्व परीक्षा नियोजित असताना आज सकाळी अचाकन आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं. तसेच, त्या पुन्हा कधी घेतल्या जातील, याविषयी देखील काहीही स्पष्ट न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरल्याचं पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“MPSC च्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलल्यामुळे वर्षानुवर्ष त्यासाठी तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा”, असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

 

“राजकीय पक्षांच्या रॅली चालू आहेत. आंदोलनं चालू आहेत. आम्ही सगळेच पक्ष आपापले कार्यक्रम करत आहोत. सत्तापक्षाच्या ट्रॅक्टर रॅली होत असतात. परीक्षेमध्ये तर सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात असतं. सरकारने दिलेलं करोनाचं कारण अतिशय तकलादू आहे. त्यामुळे या कारणामुळे परीक्षा रद्द करणं अतिशय चुकीचं होईल. मराठा विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल. पण आज या परीक्षा तात्काळ घ्यायला हव्यात”, अशी देखील प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

MPSC : पुण्यात विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक, परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ उतरले रस्त्यावर!