18 February 2020

News Flash

हे तर विश्वासघात करणारे जनद्रोही सरकार

येथील चांदोजी पावडे मंगल कार्यालयात भाजपच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस यांची टीका

नांदेड : जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आलेले तिघाडी सरकार रोजच जनतेचा विश्वासघात करत आहे. त्यामुळे हे जनद्रोही सरकार आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला. भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

येथील चांदोजी पावडे मंगल कार्यालयात भाजपच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रताप पाटील चिखलीकर  होते. या वेळी व्यासपीठावर आमदार राम पाटील रातोळीकर, राजेश पवार, तुषार राठोड, भीमराव केराम, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके आदींची उपस्थिती होती.

राज्यातील सरकारचा जन्म कसा झाला हे सांगण्याची काही आवश्यकता नसून मेरीटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांला वर्गाबाहेर बसवत ३०  टक्के गुण मिळवलेले तीन जण एकत्र आले व आम्ही सरकार चालविण्यात सक्षम आहोत म्हणत अंक गणितातून हे सरकार स्थापन झाले आहे. हे विरोधाभास असणारे सरकार असून आचार, विचार एक नाही, तत्त्वांना तिलांजली देवून खुर्चीसाठी एकत्र आले आहेत. जनतेने युतीला बहुमत दिले होते; परंतु सत्तेसाठी यातील एका पक्षाने दुसऱ्याशी घरोबा केला आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर तोफ डागली. देशाच्या इतिहासातले हे पहिलेच असे सरकार आहे. आम्ही सरकार कधी येईल याची वाट पाहत नसून जनतेला न्याय देण्यासाठी सतत लढत राहणारे आहोत, असे फडणवीस म्हणाले.

ही तीन चाकी रिक्षा असून ही चाके वेगवेगळ्या दिशेने चालली आहेत. तीन चाकाच्या रिक्षाला मर्यादा आहेत, देशाच्या विकासासाठी केवळ मोदीजींचे इंजिनच लागते ,असे म्हणत फडणवीस यांनी राज्यातील सरकारवर टीका केली. सत्तेतील मंत्री म्हणत आहेत मल्टीस्टारर सरकार आहे; पण असा पिक्चर जनतेने किती दिवस पाहायचा, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. लोकसभेत हारले तरी मंत्री झाले, हा आनंद फार काळ राहणार नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. तिघाडी सरकारचे सत्ता हे एकमेव सूत्र आहे. त्यांचे शेतकरी व जनतेशी काही देणे घेणे नाही, असे ते या वेळी म्हणाले.

या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकटराव गोजेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले.

First Published on January 28, 2020 3:40 am

Web Title: devendra fadnavis slams maha vikas aghadi government zws 70
Next Stories
1 भाजपचे काम कमी मार्केटिंग जास्त ; आमदार रोहित पवार यांची टीका
2 अश्लील चाळे करून बलात्काराचा प्रयत्न ; अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न
3 सांगलीतील ९३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ – जयंत पाटील
Just Now!
X